खापा, १३ : व्यापारी कल्याणकारी संस्था, खापाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष अशोक पेटकर यांच्या अध्यक्षतेत दि. 11 सप्टेंबर गुरुवारला पार पडली. नागपूर जिल्ह्यात प्रथमतःच वार्षिक सर्वसाधारण सभा ही व्यापारी कल्याणकारी संस्था खापा हिने एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने सहलीच्या स्वरूपात आयोजित केली होती. या सभेचे नियोजन किशोर आष्टणकर, वीरेंद्र तातेड, मकसूद शेख यांनी केले.
या सभेचे औचित्य साधून व्यापाऱ्यांची ऐतिहासिक सहल कलारंग टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक आकाश मारोतकर यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली. ही सहल १८ व्या शतकात, नागपूरचे भोसले राजे रघुजी भोसले यांनी देवगड जिंकल्यानंतर बांधण्यात आलेले रामटेक गड मंदिर, रामटेकमध्ये १२व्या शतकात यादव घराण्याने बांधलेले एक प्राचीन जलकुंड आणि मंदिर असलेली कर्पुर बावली, इ.स. चौथ्या शतकात वाकाटक राजवंशाची राजधानी असलेला नगरधन येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला, घोगरा महादेव पारशिवणी या ठिकाणी आनंदमय, नैसर्गिक, ऐतिहासिक वातावरणात पार पडली.
सभेमध्ये संस्थेचे सदस्य मकसूद शेख यांनी इतिवृत्त वाचन करून वार्षिक जमाखर्चाचा हिशोब मांडला. तसेच सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. तर अध्यक्ष पेटकर यांच्या मान्यतेनुसार सर्वानुमते विषय पारित करण्यात आले. संस्थेचे सदस्य तेजराम गाडीगोणे, सुनील डेकाटे यांनी व्यापाऱ्यांच्या सहकार्यातून संस्था आर्थिक स्वरूपात बळकट कशी होईल यावर मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे कोषाध्यक्ष किशोर आष्टणकर यांनी सभेस संबोधित करताना संस्था कासवाच्यागतीने चालत असुन भविष्यात नक्कीच संस्थेचा वट वृक्ष होईल. संस्थेवर टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही व संस्थेचा कारभार नेहमी पारदर्शक राहील. अशी सर्व संचालक मंडळाच्या वतीने ग्वाही दिली.
संस्थेची सभा अत्यंत शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेचे सूत्रसंचालन मकसूद शेख यांनी केले. तर प्रस्तावना सचिव विरेंद्र तातेड यांनी मांडली. तर अनिल (बंडू ) मेनकुदळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी चिंतामण सुपारे, तुळशीराम गाडीगोणे, गजानन पडोळे, नामदेव गाडीगोणे, अनिल डेकाटे, देवेंद्र श्रोते, संदीप धार्मिक, आशिष वारोतकर, कृष्णा बारापात्रे, प्रशांत बोंदरे, अमोल खुबाळकर, कैलास कापसे यांच्यासह संस्थेचे इतर सभासद व संचालक मंडळ आवर्जून उपस्थित होते.




