– समाजातील विवाहयोग्य युवक- युवतींना व्यासपीठ; ज्येष्ठांचा सन्मान, समाज एकतेचा संदेश
नागपूर :- खैरे कुणबी समाज, पश्चिम नागपूर यांच्या वतीने २२ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला भव्य वधू-वर परिचय मेळावा, ज्येष्ठांचा सत्कार सोहळा व स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला समाज बांधवांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. समाजातील विवाहयोग्य युवक- युवतींना एकमेकांची ओळख करून देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या परिचय मेळाव्यात विवाहयोग्य वधू-वरांनी आपला परिचय उपस्थित समाजबांधवां समोर करून दिला. विवाह इच्छुक युवक- युवतींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी अशा प्रकारचे सामाजिक व्यासपीठ महत्त्वपूर्ण ठरत असून, समाजातील कुटुंबांना एकमेकांशी जोडण्याचे कार्यही या माध्यमातून होत आहे. युवक- ‘युवतींच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील उपस्थितांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. कार्यक्रमा दरम्यान समाजाला योग्य दिशा देणाऱ्या, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठांचा सन्मान हा समाजाच्या संस्कारांचा, परंपरेचा आणि कृतज्ञतेचा प्रतीक असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. ज्येष्ठांच्या अनुभवातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी आणि समाजात एकता, सलोखा व परस्पर सहकार्याची भावना दृढ व्हावी, हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश होता. या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, प्रमुख पाहुण्यांचे, समाज प्रतिनिधींचे, ज्येष्ठ नागरिकांचे तसेच सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आर्थिक, शारीरिक, वैचारिक तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या योगदानामुळे हा सोहळा यशस्वी झाल्याचे आयोजकांनी नमूद केले. दरम्यान, कार्यक्रमाच्या वेळेच्या मर्यादा आणि काही अपरिहार्य अडचणींमुळे इच्छा असूनही काही मान्यवर व ज्येष्ठांचा सत्कार करता आला नाही. याबद्दल आयोजकांनी दिलगिरी व्यक्त करत, संबंधित सर्वांचा सन्मान मनात कायम असून त्यांनी क्षमा करावी, अशी नम्र विनंती केली. समाजातील युवक- युवती, ज्येष्ठ नागरिक, कुटुंबे आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींना एकाच व्यासपीठावर आणणारा हा परिचय मेळावा सामाजिक एकात्मता, आपुलकी आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत करणारा ठरला. समाजाच्या पुढील वाटचालीतही सर्व समाजबांधवांनी प्रेम, सहकार्य व आशीर्वाद देत अशाच प्रकारे सहभागी व्हावे, असे आवाहन खैरे कुणबी समाज, पश्चिम नागपूरच्या आयोजकांनी केले.






