– वेळेवर मदतीमुळे अनर्थ टळला
कामठी :- तहसील कार्यालयाजवळ सुरू असलेल्या मेट्रोच्या खोदकामादरम्यान आज एक अत्यंत थरारक घटना घडली. खोदकाम करत असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने एक मजूर १० फूट खोल खड्ड्यात पूर्णपणे दबला गेला. सुदैवाने, आजूबाजूच्या लोकांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीने केलेल्या बचावकार्यामुळे या मजुराचे प्राण वाचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालयासमोर मेट्रोचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खोदकाम सुरू असताना जमिनीचा एक मोठा भाग खचला आणि तिथे काम करत असलेला मजूर थेट खड्ड्यात पडला. त्याच्यावर मातीचा इतका थर साचला होता की, बाहेरून फक्त त्याचे डोक्याचे केस दिसत होते.
नागरिकांची धाव आणि बचावकार्य
मजूर मातीखाली दबल्याचे लक्षात येताच तिथे उपस्थित असलेले इतर मजूर आणि नागरिकांनी आरडाओरडा करत मदतीसाठी धाव घेतली. यंत्रसामग्री आणि हाताने माती बाजूला सारून अत्यंत शिताफीने त्या मजुराला बाहेर काढण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्याने श्वास गुदमरण्यापूर्वीच त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या घटनेमुळे मेट्रो कामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.








