spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कढोलीत ‘खेत बचाओ अभियानाचा’ शुभारंभ

– मृदा आरोग्य संवर्धन, संतुलित खत वापर आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन; रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

कामठी :- जमिनीची सुपीकता टिकवून शेतीची उत्पादकता वाढविणे, रासायनिक खतांचा संतुलित वापर सुनिश्चित करणे आणि नैसर्गिक शेती पद्धतींचा विस्तार करणे, या उद्देशाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘खेत बचाओ अभियानाचा’ शुभारंभ गुरुवारी कामठी तालुक्यातील कढोली ग्रामपंचायत येथे करण्यात आला. कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे.

रब्बी हंगामाच्या प्रारंभी आयोजित या उपक्रमातून शेतकऱ्यांना मातीचे आरोग्य, पीक व्यवस्थापन, जलसंधारण, पीक विविधीकरण आणि कृषी योजनांचा लाभ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतीचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीच्या सुपीकतेचे संवर्धन आणि उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर या दृष्टीने अभियानाचे महत्त्व विषद करण्यात आले.

या अभियानांतर्गत माती परीक्षणाच्या आधारे पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे, मृदा आरोग्य पत्रिकेचा प्रभावी वापर वाढविणे आणि रासायनिक खतांचा अनावश्यक वापर टाळणे याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब आवश्यक असल्याचे कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

तेलबिया, कडधान्ये आणि फलोत्पादन पिकांना प्रोत्साहन देऊन पीक विविधीकरण साधणे, तसेच भात काढणीनंतर रिकाम्या राहणाऱ्या जमिनीचा अर्थात ‘राइस फॅलो’ क्षेत्राचा रब्बी पिकांसाठी योग्य वापर करणे, या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले.

शेतीतील पराटी, पेंढा आणि अन्य पीक अवशेष जाळल्यामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान टाळण्यासाठी त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले. सेंद्रिय व नैसर्गिक शेती पद्धतींचा प्रसार, जैविक निविष्ठांचा वापर आणि शेतावरील प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पर्यायी कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यावर भर देण्यात आला.

यासोबतच जलसंधारण, पाण्याचे पुनर्भरण, पाणी साठवणूक आणि ‘प्रति थेंब अधिक पीक’ या संकल्पनेनुसार सिंचनाच्या पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (INM), एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM), शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) नोंदणी आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) यामध्ये सहभाग नोंदविण्याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. रब्बी हंगामातील पीक विमा व फळपीक विमा योजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.आत्मा यंत्रणेंतर्गत ज्वारी व चारा पिकांच्या प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांची निवड करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच स्वनिर्मित जैविक निविष्ठा केंद्राच्या (BRC) माध्यमातून जैविक निविष्ठांचा वापर आणि उपलब्धतेबाबत माहिती देण्यात आली.

या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी कढोलीचे सरपंच लक्ष्मण करारे, डॉ. रामकृष्ण, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे (CICR), नागपूर येथील डॉ. शैलेश गावंडे, कृषी विज्ञान केंद्र, नागपूरचे डॉ. उल्हास गलकाटे व डॉ. सचिन वानखेडे, कृषी विभागाच्या रामटेके मॅडम, आत्माचे कर्मचारी एम. नासरे व जांभूळकर यांच्यासह श्री. ठाकरे आणि गावातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जमिनीचे आरोग्य जपणे, उत्पादन खर्च नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य कृषी तंत्रज्ञानाचा वापर करणे, पाण्याची बचत करणे आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे, ही काळाची गरज आहे. ‘खेत बचाओ अभियान’ प्रभावीपणे राबविण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभाग व आत्मा यंत्रणेच्या वतीने करण्यात आले.

Popular Articles