नागपूर :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर संचालक कार्यालयात ‘वाचन संस्कृती आणि पालकांची भूमिका’ या विषयावर प्रसिद्ध लेखक,पत्रकार आणि बालसाहित्यिक प्रशांत व्ही.गौतम यांच्या व्याख्यानाचे २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे.
संचालक माहिती कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. नागपूर पुस्तक महोत्सवाच्या औचित्याने बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शनासाठी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी बालसाहित्यिक प्रशांत व्ही.गौतम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
बाल साहित्यिक प्रशांत व्ही.गौतम यांच्या विषयी
श्री. गौतम यांचे 16 बालकथा संग्रह आणि दोन बालकादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. ‘गोष्टींची गोष्ट’ या त्यांच्या बालकथा संग्रहास 1999-2000 या वर्षीच्या उत्कृष्ट साहित्य निर्मितीच्या राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.याच बालकथा संग्रहाची नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात एम.ए.अभ्यासक्रम (द्वितीय वर्ष)साठी क्रमिक पुस्तक म्हणून निवड करण्यात आली.
गौतम यांनी पहिले मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन, विविध अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे.साहित्य, पत्रकारिता व बालसाहित्य क्षेत्रातील योगदानासाठी राज्य पुरस्कारासह त्यांना विविध 45 पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.








