spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

घरात शिरून पाळण्यातील आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बिबट्याने पळवले; तिर्री येथील हृदयद्रावक घटनेने गाव हादरले

हंसराज, भंडारा :- थेट घरात प्रवेश करून पाळण्यात झोपलेल्या आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बिबट्याने उचलून नेल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत तिर्री येथे घडली. या हल्ल्यात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तिर्री येथील अभिमन बोंद्रे यांचा आठ महिन्यांचा चिमुकला शुक्रवारी सायंकाळी घरातील पाळण्यात शांत झोपला होता. कुटुंबीय घरातच असताना अचानक बिबट्याने घरात शिरकाव केला. काही कळण्याच्या आतच त्याने पाळण्यातील बालकावर झडप घालून त्याला उचलून नेले. या अनपेक्षित घटनेमुळे कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली; मात्र हल्ल्यात निष्पाप बालकाचा जीव गेला. काही क्षणांपूर्वी घरात असलेला चिमुकल्याचा आवाज कायमचा हरपल्याने बोंद्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

भंडारा जिल्ह्यात वन्यप्राण्यांचे हल्ले सातत्याने वाढत आहेत. शेतशिवारातून आता थेट घराच्या उंबरठ्यापर्यंत बिबट्याचा वावर पोहोचल्याने घरातील लहान मुलेही सुरक्षित नसल्याचे अधोरेखित झाले असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

“दरम्यान, कळवूनही वनखात्याचे पथक वेळेत न पोहोचल्याची तक्रार करत गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. संभाव्य धोका टाळण्यासाठी पूर्वखबरदारी का घेतली नाही, असा जाब विचारत बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ पिंजरा बसवावा, पहारा कडक करावा आणि सुरक्षिततेची ठोस व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली. कोवळ्या जिवाचा अंत झाल्यावर तरी प्रशासन खडबडून जागे होणार का, असा रोखठोक प्रश्न तिर्रीतील नागरिकांनी विचारला आहे.”

Popular Articles