हंसराज,पवनी :- अवैध रेती तस्करी आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांविरोधात पवनी पोलिसांनी कठोर पाऊल उचलत तीन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल ३० लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पेट्रोलिंगदरम्यान राबवलेल्या या मोहिमेत पोलिसांनी चार ट्रॅक्टर-ट्रॉलींसह चार ब्रास रेती ताब्यात घेतली आहे.
पहिल्या कारवाईत मौजा बेटाळा येथील मुडले राईस मिलसमोरील रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून मिथुन भिवाजी कुर्झकर (२५, रा. नायगाव) आणि विवेक रमेश कन्नाके (२३, रा. सिंगोरी) यांना पकडले. त्यांच्याकडून न्यू हॉलंड व महिंद्रा कंपनीचे दोन ट्रॅक्टर, दोन ट्रॉली आणि दोन ब्रास रेती असा १६ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. दुसऱ्या कारवाईत पवनीतील एक्सिस बँकेजवळ विनाक्रमांकाचा स्वराज ट्रॅक्टर, ट्रॉली व एक ब्रास रेती असा ७ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, मात्र यातील अज्ञात चालक फरार झाला.
तिसऱ्या कारवाईत मौजा वलनी येथील वैनगंगा नदीपात्रातून आरोपी सुहाग देवचंद माटे (२९, रा. वलनी) याला विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर, ट्रॉली आणि एक ब्रास रेतीसह (किंमत ७ लाख ६ हजार रुपये) रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(ई) नुसार तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व पो.नि. डागे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.शि. खराबे, खांडेकर आणि पो.अ. राठोड यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.






