spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस, उष्णतेची लाट अधिक ?

मुंबई :- महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची धाकधूक वाढवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत हवामान विभागाने नैऋत्य मान्सून 2026 साठी दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासाठी यंदाच्या मान्सून हंगामात अत्यंत चिंताजनक चित्र समोर आले आहे. राज्यात यंदा पाऊस सामान्यपेक्षा कमी पडण्याची आणि उष्णतेच्या लाटा तीव्र राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशभरात यंदाच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर 2026) दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे प्रमाण सामान्यपेक्षा कमी मानले जाते. महाराष्ट्र हा प्रामुख्याने मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्प या दोन्ही विभागांत मोडतो. या दोन्ही विभागांत यंदा सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. मध्य भारतात 43 टक्के तर दक्षिण द्वीपकल्पात 45 टक्के संभाव्यता कमी पावसाची आहे.

कोअर झोनमधील कोरडवाहू शेती धोक्यात?

महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडाआणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भाग हे मान्सून कोअर झोन मध्ये येतात. हाच झोन देशातील आणि राज्यातील बहुतांश कोरडवाहू शेतीचा मुख्य कणा आहे. IMD च्या अंदाजानुसार, या कोअर झोनमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची 43 टक्के शक्यता आहे. त्यामुळे चालू वर्षातील खरीप हंगामावर याचा विपरित परिणाम होण्याची भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात आहे. जून 2026 या पहिल्या महिन्यातही देशभरात सरासरीच्या 92 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता असल्याने, महाराष्ट्रात जून उजाडला तरी पावसाची ओढ कायम राहू शकते.

जून महिन्यात रात्रीही उकाडा; उष्णतेच्या लाटांचा इशारा

पावसाची तूट असतानाच, IMD ने जून 2026 मध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागांत सामान्यपेक्षा अधिक उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि काही अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक राहील. धक्कादायक बाब म्हणजे, किमान तापमानही सामान्यपेक्षा जास्त राहणार असल्याने रात्रीच्या वेळीही नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

‘एल निनो’चे संकट गडद

सध्या प्रशांत महासागरावर न्यूट्रल परिस्थिती असली तरी, हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, मान्सून हंगामाच्या उत्तरार्धात ‘एल निनो’ परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार, ज्या ज्या वर्षी एल निनो सक्रिय होतो, त्या वर्षात भारतात, विशेषतः मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची तूट अधिक जाणवते.

शेती, पाणी आणि वीजनिर्मितीवर होणार परिणाम

सामान्यपेक्षा कमी पाऊस पडल्यास त्याचे थेट दुष्परिणाम शेती , पाणीपुरवठा, जलविद्युत निर्मिती आणि एकूणच पर्यावरणावर होऊ शकतात, असे IMD ने आपल्या अहवालात नमूद केले आहे. महाराष्ट्रात आधीच पाणीटंचाईची तीव्र समस्या असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी हा अंदाज अधिकच चिंताजनक आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.