– गडचिरोलीत जमिनीत लपवलेला शस्त्रसाठा जप्त
गडचिरोली :- महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी कारवाया जवळपास संपुष्टात येत असल्या तरी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवादी अजूनही जंगलांमध्ये शस्त्रे आणि स्फोटक सामग्री लपवून ठेवत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील दुर्गम जंगलांचा फायदा घेत माओवादी गुप्तपणे शस्त्रनिर्मिती आणि स्फोटक तयार करण्याचे काम करत होते. 23 मे रोजी गडचिरोलीत करण्यात आलेल्या कारवाईनंतर सुरक्षा दलांना पुन्हा एक मोठे यश मिळाले आहे. शोध मोहिमेदरम्यान जंगलातील जमिनीखाली लपवून ठेवलेला मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घटनास्थळीच नक्षलवाद्यांची शस्त्रनिर्मिती सामग्री आणि उपकरणे नष्ट करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि इतर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
शरण आलेल्या नक्षलवाद्यांकडून मिळाली माहिती
पोलिसांना ही माहिती शरण आलेल्या नक्षलवाद्यांकडून मिळाली. अलीकडेच आत्मसमर्पण केलेल्या काही नक्षलवाद्यांची चौकशी केली असता त्यांनी या गुप्त ठिकाणाची माहिती दिली. छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील काकूर पोलीस ठाणे हद्दीपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील जंगलात शस्त्रे आणि शस्त्रनिर्मिती साहित्य लपवून ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार संयुक्त शोध मोहीम राबवण्यात आली.
नक्षलवाद्यांच्या पुरवठा साखळीला मोठा धक्का
या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी शस्त्रनिर्मितीसाठी वापरण्यात येणारी लेथ मशीन, वीजपुरवठ्यासाठी सोलर पॅनल आणि जनरेटरसह विविध साहित्य जप्त केले. या गुप्त कारखान्याचा पर्दाफाश झाल्याने नक्षलवाद्यांच्या शस्त्रपुरवठा साखळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
1 इंसास रायफल
2 क्लेमोर माईन
2 सिंगल शॉट रायफल
110 डेटोनेटर आणि कॉर्टेक्स वायर
12 बोर रायफल
500 हून अधिक बीजीएल
12 जिवंत काडतुसे
7 बीजीएल लॉन्चर
12 बोर रायफलची काडतुसे
3 ट्यूब लॉन्चर
25 किलो आयईडी स्फोटक
2 लेथ मशीन
या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर मोठा परिणाम होणार असल्याचा विश्वास सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.



