spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देऊया – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

– गडचिरोलीत १५ ते २१ ऑगस्ट जलसंधारण सप्ताह; २१ ऑगस्टला ३ किमी ‘वॉक फॉर वॉटर’

– मुख्य शासकीय स्वातंत्र्यदिन समारंभात अभियानाच्या लोगोचे अनावरण

गडचिरोली :- मृद व जलसंधारणाचे महत्त्व जनमानसात रुजवून जलसंवर्धनाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी जिल्ह्यात १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असून २१ ऑगस्ट रोजी ३ किलोमीटरची ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, युवक आणि विविध संस्थांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले आहे.

आज, १५ ऑगस्ट रोजी आयोजित मुख्य शासकीय स्वातंत्र्यदिन समारंभात जलसंधारण अभियानाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या माध्यमातून माती व पाण्याच्या संवर्धनाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवून अभियानात व्यापक लोकसहभाग निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातील योगदानाच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

२१ ऑगस्टला ‘वॉक फॉर वॉटर’

जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट रोजी ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ या संकल्पनेवर ३ किलोमीटरची ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येणार आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, विविध संघटना तसेच नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

QR कोड स्कॅन करून रील स्पर्धेत सहभागी होता येणार

जलसंधारण सप्ताहानिमित्त १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी ‘Reel for Soil and Water Conservation’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक युवक-युवतींनी QR कोड स्कॅन करून स्पर्धेत सहभागी व्हावे. माती व पाणी संवर्धन, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, वृक्षारोपण आणि जलसंधारणाच्या नाविन्यपूर्ण उपायांवर ३० ते ६० सेकंदांची रील तयार करता येणार आहे. विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

याशिवाय शाळा-महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला, पोस्टर व वादविवाद स्पर्धा, जलसंधारण शपथ, वृक्षारोपण तसेच विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जलसंधारण ही केवळ शासकीय मोहीम न राहता प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आणि व्यापक लोकचळवळ व्हावी. पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त संचय करून ते जमिनीत मुरविण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, युवक आणि विविध संस्थांनी जलसंधारण सप्ताह, ‘वॉक फॉर वॉटर’ तसेच अन्य उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ मिलिंद नरोटे व जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.