spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

साकोली परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा छापा; ४५ लाखांच्या मुद्देमालासह अवैध रेती जप्त, दोघे ताब्यात

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- जिल्ह्यात अवैध रेती उपसा आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अवैध रेतीची साठवणूक आणि वाहतूक करणारा एक मिनी टिपर, जेसीबी आणि रेती असा एकूण ४५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जांभळी जवळील मैदानात रंगेहाथ पकडले

मिळालेल्या माहितीनुसार, साकोली तालुक्यातील सावरबंध येथील सुधीर शामराव बडवाईक (४३) आणि सेंदुरवाफा येथील रोशन विजय कापगते (२४) हे दोघे संगनमताने अवैध रेतीची चोरी करून तिची साठवणूक करत होते. जांभळी/सडक जवळील ‘एव्हीएन इंजिटेक’ प्रा.लि. कंपनीच्या बाजूला असलेल्या खुल्या मैदानात ही रेती साठवून ठेवली होती. ज्यावेळी आरोपी जेसीबीच्या साहाय्याने मिनी टिपरमध्ये रेती भरत होते, त्याच वेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिथे छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे: अशोक लेलॅन्ड मिनी टिपर: (क्रमांक MH 40/DC 2669) – किंमत २०,००,००० रुपये., जेसीबी मशीन: (क्रमांक NL 03/A 8293) – किंमत २५,००,००० रुपये., रेती: साधारण २ ब्रास – किंमत १२,००० रुपये. असा एकूण ४५ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून साकोली पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक ४९/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राऊत व स्था.गु.शा. पथकाने केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास साकोली पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Popular Articles