spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पर्यटन क्षेत्रातील उद्योजकतेसाठी महाराष्ट्र शासनाची ‘आई’ योजना

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत महिला पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महिलांमध्ये उद्योजकता व नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. १९ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार पर्यटन संचालनालयाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आई’ महिला केंद्रित आणि लिंग समावेशक पर्यटन धोरण अधिकृतपणे जाहीर केले आहे. महिला उद्योजकता विकास, महिलांकरिता दर्जेदार पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने आणि सवलती, तसेच प्रवास व पर्यटन विकास अशा महत्त्वपूर्ण पंचसूत्रीवर हे धोरण आधारलेले आहे. पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग केवळ पर्यटक म्हणून नव्हे, तर यशस्वी व्यावसायिक व मार्गदर्शक म्हणून वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या धोरणांतर्गत पर्यटन संचालनालयाने महिला उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अत्यंत फायदेशीर अशा प्रोत्साहने व सवलतींची तरतूद केली आहे. पर्यटन क्षेत्राशी संबंधित कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्यासाठी महिला उद्योजकांनी अधिकृत बँकेकडून १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करून घेतल्यास, त्या कर्जावरील व्याजाचा परतावा १२ टक्के दराने किंवा कमाल ४.५० लाख रुपयांपर्यंत, अथवा ७ वर्षांच्या कर्ज कालावधीसाठी यापैकी जे आधी घडेल ते पर्यटन संचालनालयाकडून थेट केला जाणार आहे. थोडक्यात सांगायचे तर, महिलांना १५ लाखांपर्यंतचे कर्ज एका प्रकारे बिनव्याजी स्वरूपात उपलब्ध होणार आहे. ही सवलत मिळवण्यासाठी संबंधित पर्यटन व्यवसाय हा पूर्णपणे महिलांच्या मालकीचा आणि त्यांच्याद्वारेच चालविला गेलेला असणे आवश्यक आहे. तसेच, त्या व्यवसायामध्ये किमान ५० टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी वर्ग महिला असणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासोबतच लाभार्थी महिला, तिचा व्यवसाय आणि कर्ज देणारी बँक ही महाराष्ट्रातच स्थित असणे आवश्यक असून, कर्ज खाते आधार लिंक असणे आणि कर्जाचे हप्ते वेळेत भरणे गरजेचे आहे.

या योजनेची व्याप्ती अत्यंत मोठी असून यामध्ये पर्यटन क्षेत्राशी निगडित विविध प्रकारच्या व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. महिला उद्योजक या योजनेचा लाभ घेऊन कॅरॅव्हॅन, बिचशॅक, साहसी पर्यटन (जमीन, हवा व जल), पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, होमस्टे, निवास व न्याहरी (बेड अँड ब्रेकफास्ट), रिसॉर्ट, मोटेल, हाऊसबोट, टेंट, ट्रीहाऊस, व्होकेशनल हाऊस, पर्यटन व्हिला, वूडन कॉटेजेस आणि पॉड्स यांसारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प सुरू करू शकतात. तसेच महाभ्रमण, रेस्टॉरंट, उपहारगृह, फास्टफुड केंद्र, महिला चलित कॉमन किचन, कॅफे, बेकरी यांसारखे खाद्य व्यवसाय किंवा टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, टूर मार्गदर्शक, क्रूझ सेवा आणि टूर अँड ट्रॅव्हल एजन्सी यांसारख्या सेवा क्षेत्रातही आपले नशीब आजमावू शकतात. एवढेच नव्हे तर आर्ट अँड क्राफ्ट व्हिलेज, सोव्हिनिअर शॉप, स्थानिक उत्पादनांची विक्री केंद्रे, धार्मिक स्थळांवरील मान्यताप्राप्त प्रसाद विक्री दुकाने, इव्हेंट मॅनेजमेंट, आणि पर्यटकांसाठी ई-व्हेहिकल्स, रिक्षा, मोटरसायकल, बस किंवा चारचाकी वाहने पुरवण्याचे व्यवसायही या योजनेसाठी पात्र आहेत. याशिवाय मेडीकल पर्यटन, वेलनेस सेंटर, आयुर्वेद व योगा केंद्र, आणि आदिवासी निसर्ग पर्यटनाशी संबंधित प्रकल्पांनाही या धोरणात स्थान देण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून ती अत्यंत सुटसुटीत ठेवण्यात आली आहे. इच्छुक महिलांनी पर्यटन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.maharashtratourism.gov.in उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात अर्ज करायचा आहे. अर्जासोबत ५० रुपये प्रक्रिया शुल्क भरल्याची पावती, अर्जदाराचा पासपोर्ट फोटो, व्यवसाय महिलेच्याच मालकीचा असल्याचे प्रमाणित करणारे ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील नोटरीकृत प्रतिज्ञापत्र, पॅन कार्ड आणि वैयक्तिक आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्रांपैकी एक कागदपत्र सादर करावे लागेल. तसेच आधारलिंक बँक खात्याचे पासबुक किंवा रद्द केलेला चेक, व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा (उद्योग नोंदणी, वीज बिल किंवा दुकान परवाना), आणि जागेच्या मालकीचा दस्तऐवज (७/१२ उतारा, प्रॉपर्टी कार्ड, ८-अ नमुना किंवा नोंदणीकृत भाडेकरार) जोडावा लागेल. व्यवसायाच्या स्वरूपानुसार अन्न व औषध प्रशासन परवाना, निधी पोर्टल किंवा पर्यटन संचालनालयाचे नोंदणी प्रमाणपत्र, जीएसटी क्रमांक आणि प्रकल्पाची ५०० शब्दांतील संक्षिप्त माहिती सादर करावी लागेल. सर्व कागदपत्रे योग्य आढळल्यास पात्रता प्रमाणपत्र (Letter of Intent) दिले जाईल, ज्याच्या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घेता येईल. महिलांनी नियमित हप्ते भरल्यानंतर व्याजाची रक्कम थेट त्यांच्या आधार लिंक खात्यात जमा केली जाणार असल्याने, महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन पर्यटन क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण करावी.

अधिक माहिती साठी कार्यालयीन वेळ सकाळी 10.00 ते सायं 06.00 पर्यंत दूरध्वनी क्रमांक 022-20876416/8007079321 या क्रमांकावर संपर्क करा.

Popular Articles