spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्र युवा शासन पार्टीची स्थापना; नागपुरात 14 जून रोजी पक्ष स्थापना पत्रकार परिषदेचे आयोजन

नागपूर :- राज्यातील युवक, शेतकरी, कामगार, वंचित घटक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून नव्या राजकीय पर्यायाच्या रूपाने “महाराष्ट्र युवा शासन पार्टी” या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात येत असून, त्यानिमित्त 14 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता. रवी भवन सिव्हिल लाईन नागपूर येथे पक्ष स्थापना पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे संस्थापक प्रा. आनंद मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित सशक्त, प्रगतशील आणि मानवतावादी भारत घडविण्याच्या उद्देशाने या पक्षाची स्थापना करण्यात येत आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि लोकशाही परिवर्तनासाठी कार्य करणारी चळवळ म्हणून पक्षाची वाटचाल राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात वाढती बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, कामगारांचे हक्क, शिक्षणातील विषमता, सामाजिक अन्याय, आर्थिक असमानता आणि लोकशाही मूल्यांपुढील विविध आव्हाने या पार्श्वभूमीवर परिवर्तनवादी नेतृत्वाची गरज निर्माण झाली आहे. या समस्यांवर केवळ टीका न करता प्रत्यक्ष उपाययोजना आणि जनआंदोलनाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. पक्षाच्या पत्रकानुसार, महाराष्ट्र युवा शासन पार्टी ही केवळ राजकीय संघटना नसून सामाजिक बांधिलकी जपणारी आणि मानवतेच्या मूल्यांवर आधारित व्यापक परिवर्तनाची चळवळ आहे. देश, समाज आणि मानवतेसाठी कार्य करणाऱ्या प्रामाणिक, निःस्वार्थ आणि संघर्षशील व्यक्तींना पक्षात सन्मानाचे स्थान दिले जाणार आहे. पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका, उद्दिष्टे, भावी कार्यक्रम, संघटनात्मक रचना तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी बाबतची माहिती जाहीर केली जाणार आहे. यावेळी विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्ते, युवक, विचारवंत आणि परिवर्तनवादी चळवळीतील प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. प्रा. आनंद मेश्राम यांनी राज्यातील न्याय, समानता, शिक्षण, रोजगार आणि मानवतावादी मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांना या परिवर्तनाच्या प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Popular Articles