spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महारेशीम अभियान–2026 : ‘रेशीम रथ’ला हिरवी झेंडी

– शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयांच्या अनुदानाची संधी

गडचिरोली :- रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती गावपातळीवर पोहोचविण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, आरमोरी यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘रेशीम रथ’चा शुभारंभ दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्या हस्ते तसेच मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त समिर डोंगरे यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून या जनजागृती मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

यावेळी रेशीम विकास अधिकारी ए. व्ही. वासनिक, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक जी. आर. उईके, क्षेत्र सहाय्यक कु. ए. एन. नाखले, सी. व्ही. विठ्ठले आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभाग व रेशीम संचालनालय, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात ‘महारेशीम अभियान–2026’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रेशीम उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी दि. १० फेब्रुवारी २०२६ ते ०५ मार्च २०२६ या कालावधीत नोंदणी करणे आवश्यक आहे.

टसर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी नोंदणी पूर्णपणे नि:शुल्क असून तुती लागवडीस पात्र शेतकऱ्यांना १ एकर क्षेत्रासाठी केवळ ५०० रुपये नोंदणी शुल्क भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागणार आहे. रेशीम उद्योग हा शेतीआधारित असल्याने शेतकरी स्वतःच्या शेतीवर किटक संगोपन करून कोष उत्पादनातून थेट उत्पन्न मिळवू शकतात. या माध्यमातून वर्षाकाठी सुमारे १.५० ते २.०० लाख रुपये निव्वळ नफा मिळू शकतो, अशी माहिती रेशीम विकास अधिकारी ए. व्ही. वासनिक यांनी दिली.

केंद्र पुरस्कृत ‘सिल्क समग्र–२’ योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना १ एकर तुती लागवडीसाठी तुती रोपे, सिंचन संच, किटक संगोपन गृह, संगोपन साहित्य व निर्जंतुकीकरण औषधे यासाठी एकूण रुपये ३,७५,००० पर्यंत अनुदान देण्यात येते. तसेच ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा)’ अंतर्गत समाविष्ट गावांतील शेतकऱ्यांना रुपये ३,२५,१२५ इतके अनुदान उपलब्ध आहे.

‘महारेशीम अभियान–2026’ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालय, आरमोरी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय, वडसा रोड, आरमोरी, जि. गडचिरोली येथे संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Popular Articles