spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचेकडून विविध कृषी व पूरक व्यवसाय प्रकल्पांना भेट

गडचिरोली :- जिल्ह्याच्या प्रधानमंत्री धनधान्य किसान योजनेच्या समन्वयक तथा अणुऊर्जा विभागाच्या सहसचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिनांक ११ व १२ फेब्रुवारी २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्यात विविध कृषी व पूरक व्यवसाय प्रकल्पांना प्रक्षेत्र भेट देत आढावा घेतला. या दौऱ्यात शाश्वत शेती, साठवणूक सुविधा, रेशीम, मत्स्यपालन व मृद चाचणी प्रयोगशाळा यांसारख्या उपक्रमांना विशेष प्राधान्य देण्यात आले.

गडचिरोली तालुक्यातील दिभना माल येथे नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत भाजीपाला लागवडीत सौर लाईट ट्रॅपचा वापर करून कीटकनाशकांवरील खर्चात बचत कशी साध्य करता येते, याची प्रत्यक्ष माहिती घेण्यात आली. अमिरजा येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत उभारण्यात आलेल्या गोदाम व ब्रीक लॅबचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना साठवणूक व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. आरमोरी येथील जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयात भेट देवून टसर रेशीम व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पोर्ला येथे मत्स्यपालन टाक्यांना प्रक्षेत्र भेट देऊन उत्पादनवाढीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

वडसा तालुक्यातील देसाईगंज येथील शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) ला भेट देऊन संघटित शेती व बाजारपेठ जोडणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कोंढाळा येथे ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन करून माती परीक्षणाद्वारे पीक नियोजन, खत व्यवस्थापन व उत्पादनवाढ साध्य करण्याबाबत माहिती देण्यात आली. नैनपूर येथे स्मार्ट योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या गोदाम बांधकामांची पाहणी करण्यात आली. तालुकास्तरावर साठवणूक केंद्र उभारणीमुळे शेतकऱ्यांना तातडीने विक्री करण्याची सक्ती राहणार नाही व योग्य बाजारभाव मिळविणे शक्य होईल, असे यावेळी नमूद करण्यात आले.

या दोन दिवसीय दौऱ्यात शेतीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, पूरक व्यवसाय आणि साठवणूक पायाभूत सुविधा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, खर्च कमी करणे आणि बाजारपेठेशी थेट जोडणी निर्माण करणे या बाबींवर भर देण्यात आला. जिल्ह्यातील विविध विभागांनी परस्पर समन्वयातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक प्रिती हिरळकर, कृषी उपसंचालक मधुगंगा जुलमे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय वासनिक व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.