spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महावितरणची ‘अभय योजना’: थकबाकीदार वीज ग्राहकांसाठी सुवर्णसंधी; पूर्ण व्याजमाफीसह भरघोस सवलतीचा लाभ घ्या!

वर्धा :- दिवाळीच्या मंगलमय पर्वावर आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला महावितरणने आपल्या सर्व बिगरकृषी वीज ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक व महत्त्वाची ‘अभय योजना 2026-27’ सुरू केली आहे. ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा विविध कारणांमुळे खंडित झाला आहे, अशा ग्राहकांना त्यांच्या जुन्या थकबाकीच्या विळख्यातून कायमची मुक्ती मिळवून देण्यासाठी ही योजना एक सुवर्णसंधी ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना केवळ थकबाकी भरण्याची सुलभ संधीच मिळत नाही, तर हजारो रुपयांची बचत करण्याची उत्कृष्ट संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महावितरणच्या या लोककल्याणकारी योजनेअंतर्गत 31 मार्च 2026 पर्यंत ज्या उच्च व लघुदाब वर्गवारीमधील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर बिगरकृषी ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे, तसेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेला आहे, अशा सर्व पात्र ग्राहकांना या योजनेचा थेट लाभ घेता येणार आहे. याशिवाय महावितरण डिस्ट्रिब्यूशन फ्रेंचायजीमधील ग्राहकांसाठीही ही योजना खुली करण्यात आली आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये व आकर्षक लाभ:

या योजनेतील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, थकबाकीदारांच्या संपूर्ण बिलावरील व्याज आणि विलंब आकाराची रक्कम तब्बल 100 टक्के माफ केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मूळ रकमेव्यतिरिक्त अतिरिक्त आर्थिक भार पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. योजना सुरू झाल्यापासून 15 डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. यात लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना 3 वर्षांपर्यंत वीजजोडणी खंडित असल्यास 10 टक्के आणि 3 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून वीजपुरवठा खंडित असल्यास तब्बल 20 टक्के घसघसीत सवलत मिळणार आहे. इतर सर्व लघू व उच्चदाब ग्राहकांना अनुक्रमे 10 टक्के व 15 टक्के सूट देण्यात येत आहे. ग्राहकांना आपली मूळ थकबाकी भरण्यासाठी एकाच वेळी किंवा हप्त्यांची सोयीस्कर सुविधा देण्यात आली आहे. लघुदाब ग्राहकांना 50 टक्के डाऊन पेमेंट भरून उर्वरित रकमेसाठी 6 समान व्याजमुक्त मासिक हप्ते, तर उच्चदाब ग्राहकांना 3 ते 6 व्याजमुक्त हप्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेला मोठा दिलासा:

या योजनेच्या प्रारंभीच वर्धा जिल्ह्यातील 7 ग्राहकांनी मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करित अपला सहभाग नोंदविला आहे. यामुळे त्यांच्या थकबाकीतील व्याज आणि विलंब आकार वगळून केवळ मुळ थकबाकीचा भरणा करावा लागला आहे, यात देखील या ग्राहकांना 3 वर्षांपर्यंत वीजजोडणी खंडित असल्यास 10 टक्के आणि 3 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून वीजपुरवठा खंडित असल्यास तब्बल 20 टक्के घसघसीत सवलत मिळाली आहे. इतर सर्व लघू व उच्चदाब ग्राहकांना अनुक्रमे 10 टक्के व 15 टक्के सूट देण्यात आली आहे.

अर्जाची अत्यंत सुलभ ऑनलाईन प्रक्रिया:

ग्राहकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. घरबसल्या महावितरणच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे अगदी सहजतेने अर्ज करता येणार आहे. ही योजना येत्या 15 जानेवारी 2027 पर्यंत लागू राहणार आहे.

तरी नागपूर, वर्धासह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व संबंधित थकबाकीदार वीज ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, आपले वीज बिल सुलभतेने व सवलतीत भरून महावितरणच्या या लोककल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा आणि पुन्हा एकदा अखंड व सुरळीत वीजसेवेचा आनंद घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Popular Articles