– नवेगाव बांधमध्ये उत्स्फूर्त स्वागत; घोषणांनी परिसर दुमदुमला
पंकज परशुरामकर, प्रतिनिधी
नवेगाव बांध :- ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी समाजाला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात न्याय्य वाटा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये जनजागृती करणारी ‘मंडळ यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा नवेगाव बांध येथे दाखल होताच स्थानिक नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी व बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. सायंकाळी सुमारे ५ वाजता नवेगाव बांध येथील ऐतिहासिक शिवाजी चौक टी-पॉइंट येथे ‘मंडळ यात्रा’ दाखल झाली. यावेळी ‘ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे’ तसेच ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी!’ अशा खणखणीत घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ओबीसी समाजाची वास्तविक लोकसंख्या निश्चित होऊन त्यानुसार सामाजिक न्यायाच्या योजना, आरक्षण, प्रतिनिधित्व व विकासाच्या धोरणांना योग्य दिशा मिळावी, यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. देशपातळीवर तसेच राज्यात ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी जातीनिहाय जनगणनेची मागणी दिवसेंदिवस जोर धरत असून, याच पार्श्वभूमीवर विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांना जोडणारी ही व्यापक ‘मंडळ यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात ओबीसी समाजामध्ये जनजागृती करून जातीनिहाय जनगणनेची मागणी अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवेगाव बांध येथील स्वागत कार्यक्रमाला कोहळी समाजाचे अध्यक्ष बिहारी डोंगरवार, पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, गोंदिया जिल्हा वारकरी संप्रदायाचे किशोरभाऊ तरोणे, हरिश्चंद्र चांदेवार, अण्णा पाटील डोंगरवार, महादेव बोरकर, जयंत लांजेवार, कमल जयस्वाल, परेश उजवणे, संतोष नरूळे सर, हितेंद्र लांजेवार व कालिदास पुस्तोडे यांच्यासह बहुजन समाजातील शेकडो कार्यकर्ते, नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी चौक येथे स्वागत सभेनंतर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाल्यास समाजाची वास्तविक लोकसंख्या समोर येऊन लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क व प्रतिनिधित्व निश्चित करण्यास मदत होईल, असे यावेळी सांगण्यात आले. नवेगाव बांध येथील उत्स्फूर्त प्रतिसादानंतर ‘मंडळ यात्रा’ अर्जुनी मोरगावमार्गे लाखांदूरकडे पुढील प्रवासासाठी रवाना झाली. विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करणाऱ्या या यात्रेमुळे ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठीचा हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.





