spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भटक्या कुत्र्यांच्या दहशतीवर नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांचा कडक प्रहार; डॉग स्क्वॉडचे विशेष अभियान सुरू

– धुलीवंदनाच्या दिवशी माजी नगरसेविकेसह १४ नागरिकांना चावा

कामठी :- कामठी शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध भागांत नागरिकांवर व लहान मुलांवर कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर नगर परिषद अध्यक्ष अजय अग्रवाल आणि मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी समस्येची गंभीर दखल घेत शहरात डॉग स्क्वॉड पथकाच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे विशेष अभियान सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार संवेदनशील भागांत जाळ्यांच्या साहाय्याने कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

दरम्यान, धुलीवंदनाच्या दिवशी मोकाट कुत्र्यांनी शहरात हैदोस घालत माजी नगरसेविका शांता विनायक गायधने (६६, रा. चंद्रमणीनगर) यांच्यासह एकूण १४ नागरिकांना चावा घेतला. तसेच राम मंदिराचे पुजारी महेश मधुकर देवपुजारी (५०) यांनाही कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली.

मोंढा, वाढईपुरा, मेन रोड, हैदरी चौक, चंद्रमणीनगर, कादर झेंडा व भाजी मंडी परिसरात झालेल्या या हल्ल्यांत ५ महिला व ९ पुरुष जखमी झाले असून जखमींवर कामठी उपजिल्हा रुग्णालय तसेच काहींवर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नगराध्यक्षांनी सुरू केलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून शहरात सुरक्षिततेसाठी अशा कारवाया सातत्याने कराव्यात, अशी अपेक्षा कामठीकरांनी व्यक्त केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.