नागपूर :- नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम परवानगीतील अटींच्या अनुषंगाने बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्राचे कमी प्रमाण असणे तसेच बांधकाम परवानगी व इतर मुद्यांबाबत महापौर निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी(ता.१३) बैठक पार पडली.
महापौर निता ठाकरे यांनी भूसंपादनाशी निगडित विविध विषयांवर चर्चा करताना शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच भूसंपादनासंदर्भात येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी मनपात भूसंपादन कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले. तसेच यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा अशा ही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीत उपमहापौर लिला हाथीबेड, सत्तापक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर,स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती अश्विनी जिचकार, नगरसेवक विजय झलके, उपायुक्त निर्भय जैन, नगररचना विभागाचे सहसंचालक ऋतुराज जाधव, विधी अधिकारी सुरज पारोचे, उपविभागीय अधिकारी सचिन कुमावत, उपजिल्हाधिकारी गणेश मरकड, नायब तहसीलदार राजेश देडे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, तुषार बाराहाते यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच बैठकीत भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्यूपन्सी सर्टिफिकेट) संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भोगवाटा प्रमाणपत्रासंदर्भात समितीमार्फत सुरुवातीला १०० मालमत्ता यांचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशा सूचना देखील महापौर यांनी दिले.





