बेलापूर, नवी मुंबई :- कौटुंबिक विवादांवर समोपचाराने आणि प्रभावीपणे तोडगा काढण्यासाठी कौटुंबिक न्यायालय, बेलापूर येथे दिनांक ०६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता ‘मध्यस्थी जन-जागृती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुभाष काफरे,न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, बेलापूर, नवी मुंबई यांनी भूषवले. तसेच व्यासपीठावर त्यांच्यासोबत नवी मुंबई कोर्ट बार संघटनेचे उपाध्यक्ष संदीप रामकर आणि सचिव विकास म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. शीतल गायकवाड यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये प्रशिक्षित मध्यस्थ ॲड. मोहित मोकल यांनी मध्यस्थी प्रक्रियेचे महत्त्व आणि फायदे स्पष्ट केले.
याप्रसंगी न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या संकल्पनेतून ‘मध्यस्थी’ या विषयावर लघु नाटिका सादर करण्यात आली. या लघु नाटिके मध्ये भूमिका सादर करणारे कलाकारांमध्ये ॲड. वंदना दळवी, ॲड. शोभा पाटील, ॲड. संध्या सावंत, ॲड. कृष्णा पवार, ॲड. प्रसाद मढवी, ॲड. विशाखा जाधव, ॲड. किरण भोसले, तसेच कौटुंबिक न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक कांचन किरवे आणि सहायक राज निकम यांचा समावेश होता.
या भूमिकेमधून नवरा-बायकोमधील भांडण आणि त्या भांडणांचा कुटुंबावर आणि मुलांवर होणारा नकारात्मक परिणाम स्पष्ट करण्यात आला. त्यानंतर हे दाम्पत्य न्यायालयात गेल्यावर मध्यस्थीच्या माध्यमातून त्यांचे वाद कसे मिटवले जातात, हे दाखवून शेवटी ते जोडपे एकत्र येऊन सुखी संसार होतो, हा सकारात्मक शेवट प्रभावीपणे दाखवण्यात आला.
या महत्त्वपूर्ण भूमिकेत सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना नवी मुंबई कोर्ट बार संघटना आणि कौटुंबिक न्यायालय, बेलापूर यांच्या वतीने प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रबंधक गणेश हिरवे यांनी केले. या कार्यक्रमामुळे कौटुंबिक विवादांचे न्यायालयाबाहेर सामंजस्याने निराकरण करण्यासाठी ‘मध्यस्थी’ हा एक प्रभावी मार्ग कसा आहे, याबद्दल उपस्थितांमध्ये मोठी जनजागृती झाली. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी, सुकून प्रकल्पाच्या समुपदेशक सोनल बंदबे, तालुका विधी सेवेचे कर्मचारी पटेल कौटुंबिक न्यायालयाचे कर्मचारी, विधीज्ञ वर्ग आणि पक्षकार उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कौटुंबिक न्यायालयाचे कर्मचारी आणि नवी मुंबई कोर्ट बार संघटनेचे पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




