– पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात
– ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूल पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन; कन्हानच्या राधाकृष्ण नगरातील जलनिकासी समस्येवरही तातडीच्या उपाययोजना
कामठी :- अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नीमखेडा रेल्वे उड्डाणपूल (ROB) प्रकल्पाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आज एमआरआयडीसी (MRIDC), दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रकल्पस्थळाची संयुक्त पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
पाहणीदरम्यान उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक, प्रशासकीय व समन्वयाच्या प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पावसाळा संपताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.
यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पावसाळ्यानंतर काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार असून नियोजनानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२६ पर्यंत उड्डाणपूल पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न केला जाईल.
दौऱ्यादरम्यान खासदार बर्वे यांनी कन्हान येथील राधाकृष्ण नगर परिसरालाही भेट देऊन पावसाचे पाणी साचण्याच्या गंभीर समस्येची पाहणी केली. दरवर्षी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता जलनिकासी व्यवस्था सुधारण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
नीमखेडा रेल्वे उड्डाणपूल आणि राधाकृष्ण नगरातील जलनिकासीचा प्रश्न हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित विषय असून, या दोन्ही प्रलंबित प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून विकासकामांना गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास, अपघातांचा धोका घटण्यास आणि नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




