नागपूर, ता. ३० : नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता.२९) भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसराला भेट देत ‘एकीकृत घनकचरा प्रकल्पाची’ पाहणी केली.
याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, सहाय्यक आयुक्त विकास रायबोले, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, सल्लागार जगताप यांच्यासह सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनीचे प्रकल्प प्रमुख नितीन पटवर्धन, महाव्यवस्थापक दीपक पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे रोहिदास राठोड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्वप्रथम एकीकृत शहरी घनकचरा प्रकल्प (सुजबिडी ) येथील सुका कचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. या ठिकाणी दररोज ८०० टन कचरा संकलित केला जातो. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी एमआरएफ फॅसिलिटी असणाऱ्या सुका कचरा प्रक्रिया केंद्राची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली. नंतर वजन काटाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पातील कचऱ्याचे ढिगारे लवकरात लवकर कमी करून, कचऱ्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेची गती वाढविण्यासह प्रकल्प परिसराची स्वच्छता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.








