– महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय
नागपूर :- संतुलित आहार, पोषणाचे महत्व व निरोगी जीवनशैलीबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नागपूर महानगरपालिका व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोक कल्याण समितीतर्फे शहरात सप्टेंबर महिन्यात जनजागृती मोहिम राबविली जाणार आहे.
यासंदर्भात महापौर निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कक्षात बैठक पार पडली. यात जनजागृती करण्याच्या संदर्भात विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, आरोग्य समितीच्या सभापती मनीषा अतकरे, आरोग्य समितीचे उपसभापती श्रीकांत आगलावे, परिवहन समितीचे उपसभापती सुधीर (बंडू) राऊत, रा. स्व. संघाच्या लोक कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता, सचिव माधव उराडे, डॉ. हर्षद दासरे, डॉ. प्रसाद वरकडकर, सविता जोशी, जयंत जोशी, माजी उपमहापौर संदीप जाधव वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व प्रफुल जोशी उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा भारतीच्यावतीने दरवर्षी सप्टेंबर महिना सुपोषण महिना म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने नागरिकांमध्ये पोषण, आरोग्य व संतुलित आहाराबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत मनपाच्या शाळांमध्ये तसेच आशा वर्करच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपली बसवर या मोहिमेबद्दल बॅनर लावण्यात येईल. तसेच शहराच्या प्रमुख चौकांमध्ये फलक लावण्याचे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी दिले.





