spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपाची आरक्षण सोडत जाहीर

– अनुसूचित जाती महिलांसाठी १५, अनुसूचित जमातीसाठी ६ व मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी २० जागा, सर्वसाधारण प्रभागातील ३५ राखीव

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण महिला या वर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्याची मंगळवारी(ता.११) सोडत काढण्यात आली. महानगरपालिकेतील ३८ प्रभागातील विविध प्रवर्गातील एकूण १५१ जागांपैकी ७६ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

नागपूर महानगरपालिकेत एकूण १५१ जागांपैकी अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी ३० जागा राखीव आहेत. त्यापैकी १५ जागा महिलांसाठी राखीव झाल्या. अनुसूचित जमातीसाठी एकूण १२ जागा राखीव आहेत. त्यापैकी ६ जागा महिलांना राखीव झाल्या. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण ४० जागा राखीव आहेत. त्यापैकी २० जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. उर्वरित ६९ सर्वसाधारण मतदारसंघातील जागांपैकी ३५ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत.

कविवर्य सुरेश भट सभागृहात मंगळवारी सकाळी आरक्षण सोडतीला सुरूवात झाली. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., उपायुक्त मिलिंद मेश्राम, सहाय्यक आयुक्त श्याम कापसे, सहाय्यक आयुक्त नरेंद्र बावनकर, सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता सुनील उईके, रितेश लोखंडे, अनंता नागमोते, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, निवडूक विभागाचे सर्वश्री अरुण जोगे, पुरुषोत्तम पांडे, प्रशांत सपाटे, सांतोस मोगीलवार, दिलीप देवगडे, सुमित मुटकूरे, रवींद्र बंड, आशुतोष पानतावणे, कमलेश झंझाळ, जितेंद्र धकाते यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आरक्षण सोडत काढण्यात आली. मनपाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी आरक्षण सोडतीची प्रक्रिया उपस्थितांना समजावून दिली. आरक्षण सोडत पारदर्शक पद्धतीने काढण्यात आली. आरक्षित असलेल्या प्रभागांची नावे उपस्थितांना दाखविण्यात आली व ते एका पारदर्शक काचेच्या पेटीत टाकण्यात आली. मनपाच्या नेताजी शाळांच्या मुलांच्या हातांनी सोडत काढण्यात आल्या. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अशा क्रमाने ही आरक्षण सोडत काढण्यात आली.

१७ रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध

मंगळवारी झालेल्या सोडतीनंतर आरक्षण सोडतीचे प्रारुप येत्या १७ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. या प्रारुपावर हरकत किंवा सूचना करण्यासाठी येत्या २४ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत दिली आहे. यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर येत्या २ डिसेंबरला आरक्षणाची सोडत प्रसिद्ध केली जाणार आहे.

पारदर्शक पद्धतीने सोडत – आयुक्त डॉ. चौधरी

नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करून पारदर्शक पद्धतीने आरक्षणाची सोडतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. या सोडतीचे प्रारुपाला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल. आरक्षणाचे प्रारुप महानगरपालिकेच्या कार्यालयात तसेच महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सोडतीचे थेट प्रक्षेपण

महापालिकेच्या आजच्या आरक्षण सोडतीचे थेट प्रक्षेपण महानगरपालिकेच्या फेसबुक पेजवर करण्यात आले तसेच स्थानिक टीव्ही चॅनेलवर सुद्धा थेट प्रक्षेपण करण्यात आले. ही सोडत पाहण्यासाठी अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष हजर होते. तसेच मोठ्या स्क्रिनवर सोडतीनंतरचे चित्र उपस्थितांना दाखविण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.