spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भारत माता की जय’च्या गजराने दुमदुमला नागपूर

– हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ७०० मीटर लांब तिरंगा घेऊन शहरात भव्य रॅली

नागपूर :- ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने नागपूर शहरातील प्रमुख चौक दुमदुमून गेले. निमित्त होते केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रविवारी (ता. ९) आयोजित भव्य ‘तिरंगा रॅली’चे. क्रांती दिनाचे औचित्य साधत देशभक्तीच्या वातावरणात निघालेल्या या रॅलीने संपूर्ण शहराचे देशभक्तीपर वातावरण निर्माण केले.

रामनगर चौकातील बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापासून या रॅलीची सुरुवात झाली. महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला मार्गस्थ करण्यात आले. रामनगरहून निघालेली ही रॅली लक्ष्मी भुवन चौक मार्गे शंकर नगर चौकात पोहोचली. या रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे तब्बल ७०० मीटर लांब तिरंगा होता, जो नागरिकांच्या शिस्तबद्ध सहभागाने एका लांब प्रवासात झळकत होता.

देशभक्तीपर सोहळ्यात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर निता ठाकरे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रा. संजय भेंडे, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र बाल्या बोरकर परिवहन समिती सभापती मंगला खेकरे,आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, जलप्रदाय विशेष समिती सभापती दिव्या धुरडे, धरमपेठ झोन सभापती धनश्री देशपांडे लक्ष्मी नगर झोन सभापती तारा यादव, नगरसेविका पूजा पाठक नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा,  योगेश पाचपोर, नगरसेवक सुनिल हिरणवार, माजी नगरसेवक संदीप जाधव, विजय होले, श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे, विष्णू चांगदे नगरसेवक प्रदीप पोहणे, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, अर्चना डेहणकर, तसेच अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम, शिक्षणाधिकारी वंदना महाजन, क्रीडा अधिकारी डॉ पीयुष आंबुलकर, उपशिक्षणाधिकारी सुभाष उपासे, एनडीएस पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्यासह इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीची रचना अत्यंत आकर्षक होती. सर्वप्रथम ७०० मीटर लांब तिरंगा हाती घेऊन नागरिक चालत होते, त्यानंतर माजी सैनिक, अग्निशमन जवान, उपद्रव शोध पथकाचे जवान आणि वाल्मिकी नगर हिंदी माध्यमिक शाळा, विवेकानंद हिंदी माध्यमिक शाळा तसेच शिवणगाव मराठी शाळेचे विद्यार्थी विविध वेशभूषेत सहभागी झाले होते.

यावेळी पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले संस्कृती नृत्य आणि गुरू तेजबहादुर सिंह गुरुद्वाराच्या वतीने दाखवण्यात आलेली शस्त्रांची प्रात्यक्षिके विशेष ठरली. तसेच, हातात तिरंगा ध्वज घेऊन स्केटिंग करत रॅलीचे नेतृत्व करणारे अथांग राजगुरू आणि उमंग नितनवरे उपस्थितांचे आकर्षण ठरले.

याप्रसंगी बोलताना महापौर निता ठाकरे यांनी सांगितले की, नव्या पिढीला आपल्या स्वातंत्र्याचे महत्त्व समजावे आणि देशसेवेची भावना रुजावी, यासाठी या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या देशभक्तांचे स्मरण करून देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची ज्योती नागपुरात कशी प्रज्वलित झाली, याची सविस्तर माहिती त्यांनी उपस्थित नागरिकांना दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.