– मनपाच्या ‘मेगा स्वच्छता मोहिमे’तर्गत १४ जूनला ७५ केंद्रांवर ई-कचरा संकलन
नागपूर :- जागतिक पर्यावरण दिन ते २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने नागपूर शहरात ‘मेगा स्वच्छता मोहीम’ राबवली जात आहे. नागपूर महानगरपालिकेने नागरिकांना एकत्र आणून परिसर स्वच्छ आणि हिरवागार बनवण्यासाठी या १५ दिवसांच्या विशेष मोहिमेची सुरुवात केली आहे. या मोहिमेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून, महापौर व मनपा आयुक्त यांच्या आदेशानुसार, येत्या १४ जून २०२६ रोजी शहरात मनपा मुख्यालयमध्ये एक, मनपाचे 10 क्षेत्रीय कार्यालय, मनपाच्या शाळा मध्ये 29, ग्रंथालय मध्ये 25 व RRR (Reduce, Reuse, Recycle) Centre येथे 10 असे एकूण ७५ ई-कचरा (E-Waste) संकलन केंद्र उभारण्यात येत आहेत.
एकाच दिवशी, विशेष मोहीम दिनांक १४.०६.२०२६ (रविवार) वेळ सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत तुमच्या जवळच्या ‘या’ ७५ केंद्रांवर जमा करा ई-कचरा नागरिकांच्या सोयीसाठी शहराच्या विविध भागांत एकूण ७५ संकलन केंद्र (E-Waste Collection Centers) तयार करण्यात आली आहेत. आपला परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील, कार्यालयातील सर्व निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू/साहित्य कचऱ्यात न फेकता किंवा घरात साठवून न ठेवता, १४ जून रोजी आपल्या परिसरातील मनपाच्या ‘E-Waste Collection Center’ वर जमा करून या महा-स्वच्छता मोहिमेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.







