spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

३०९ अखंड ज्योतींनी नरखेड उजळले!

– गायत्री मंदिरात नवरात्रोत्सवाची सांगता; दीपयज्ञ, महाआरती व महाप्रसादाला भाविकांची उपस्थिती

नरखेड, प्रतिनिधी :- नरखेड येथील गायत्री प्रार्थना मंदिर व ऋषीश्वर देवस्थानात अश्विन नवरात्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त ३०९ सामूहिक अखंड ज्योती प्रज्वलित करण्यात आल्या. ज्योतींच्या प्रकाशाने आणि विविध धार्मिक अनुष्ठानांनी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

नवरात्रोत्सवादरम्यान दररोज एककुंडीय गायत्री यज्ञ, विविध संस्कार, दुर्गासप्तशती पारायण आणि देवीची आरती असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आरतीनंतर गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

दीपयज्ञ अन् महाआरतीने उत्सवाची रंगत

उत्सवाच्या निमित्ताने दीपयज्ञ व महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी देवीला नैवेद्य अर्पण करून विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. धार्मिक विधींची पूर्णाहुती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. गायत्री प्रार्थना मंदिर व्यवस्थापन समिती आणि गायत्री परिवार ट्रस्ट, नरखेड मंडळ यांच्या वतीने या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सामूहिक उपासना, यज्ञ आणि आरतीमुळे परिसरात श्रद्धा व भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

Popular Articles