spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नवेगावबांधला मिळाली ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नवी ओळख

– नागपूर विभागातील पहिले ‘पुस्तकांचे गाव’; मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते दालनाचे लोकार्पण

पंकज परशुरामकर,प्रतिनिधी 

नवेगावबांध :- निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या नवेगावबांध गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नवेगावबांधला आता ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नवी ओळख मिळाली असून, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात उभारण्यात आलेल्या ‘पुस्तकांचे गाव’ दालनाचे लोकार्पण शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला गोंदियाचे जिल्हाधिकारी मंदार पत्की, पद्मश्री परशुराम खुणे, जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे, सरपंच हिरा पंधरे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक श्यामकांत देवरे, डॉ. अ. का. कापगते, समन्वयक रामदास बोरकर, एच. पी. गजभिये यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या बँड पथक व लेझीमच्या तालात मान्यवरांना पुस्तक दालनापर्यंत नेण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन व फीत कापून दालनाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांनी दालनाची पाहणी केली. मुख्य कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम्, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने झाली. यावेळी मंत्री डॉ. उदय सामंत व आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थितांना संबोधित केले.

‘पुस्तकांचे गाव’ उपक्रमाच्या माध्यमातून नागरिक, विद्यार्थी, पर्यटक आणि पुस्तकप्रेमींना विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गावात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी एका वाचन कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले असून, आगामी काळात आणखी नऊ वाचन कट्टे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे गावात एकूण दहा वाचन कट्टे निर्माण होणार आहेत.

नवेगावबांधचा ‘पुस्तकांचे गाव’ उपक्रमात समावेश झाल्याने गोंदिया जिल्ह्याच्या सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातही भर पडली आहे. विशेष म्हणजे नागपूर विभागातील पहिले ‘पुस्तकांचे गाव’ होण्याचा मान नवेगावबांधला मिळाला आहे. निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गावाला आता वाचन संस्कृतीची जोड मिळाल्याने पर्यटनासोबत ज्ञानपर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शरद मेश्राम यांनी केले. संचालन प्रा. लक्ष्मीकांत कापगते यांनी केले, तर रामदास बोरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नवेगावबांध फाउंडेशनसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी सहकार्य केले.

गावात उभारले जाणार १० वाचन कट्टे!

‘पुस्तकांचे गाव’ या उपक्रमातून नवेगावबांधमध्ये नागरिक, विद्यार्थी, पर्यटक आणि पुस्तकप्रेमींना विविध विषयांवरील पुस्तके सहज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गावात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी एका वाचन कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले असून, आगामी काळात आणखी नऊ वाचन कट्टे उभारण्याचे नियोजन आहे.

त्यामुळे नवेगावबांधमध्ये एकूण १० वाचन कट्ट्यांच्या माध्यमातून पुस्तक आणि वाचक यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.