– १०५ घरांवर ४२४ किलोवॅट क्षमतेचे सौर प्रकल्प
गडचिरोली :- पारंपरिक वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढविण्याच्या दिशेने गडचिरोली तालुक्यातील नवेगावने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत नवेगावची जिल्ह्यातील पहिले ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ म्हणून निवड करण्यात आली आहे. गावातील १०५ वीज ग्राहकांनी आपल्या घरांच्या छतांवर एकूण ४२४.२२ किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. या कामगिरीबद्दल गावाला विकासकामांसाठी एक कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
पाच गावांमध्ये रंगली स्पर्धा
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील पाच गावांमध्ये आदर्श सौरग्राम निवडीसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अहेरी तालुक्यातील आलापल्ली व कुनघाडा, चामोर्शी तालुक्यातील आष्टी, गडचिरोली तालुक्यातील नवेगाव आणि वडसा तालुक्यातील कुरुड या गावांचा समावेश होता.
१७ सप्टेंबर २०२५ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत नवेगावने सर्वाधिक सौर ऊर्जा निर्मिती क्षमता उभारून प्रथम स्थान मिळविले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गावातील कामगिरीची पडताळणी केल्यानंतर नवेगावची मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून निवड केली.
सरकारी इमारतींवरही सौर प्रकल्प उभारणार
गावाला मिळणाऱ्या एक कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीतून आता शासकीय आणि निमशासकीय इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत गावातील १७ ठिकाणी एकूण १०६ किलोवॅट क्षमतेचे सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या कामांसाठी ६३.१२ लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले असून, पुढील कार्यवाहीसाठी ते सादर करण्यात आले आहे.
वीज बचतीसोबत पर्यावरण संवर्धनालाही हातभार
घरगुती स्तरावर सौर ऊर्जेचा यशस्वी वापर केल्यानंतर आता सार्वजनिक इमारतींनाही सौर ऊर्जेची जोड मिळणार आहे. यामुळे शासकीय वीज खर्चात बचत होण्याबरोबरच पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने नवेगावचा हा उपक्रम जिल्ह्यातील अन्य गावांसाठी प्रेरणादायी ठरण्याची अपेक्षा आहे. अधिकाधिक गावांनी सौर ऊर्जेचा स्वीकार करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






