पांढरकवडा ११ – शिवसेना शिंदे गटाकडून केळापूर तालुक्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या नियुक्त्या पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लक्षात घेऊन पक्षाची ताकद वाढविण्यासाठी ही पावले उचलली गेली आहेत. या कार्यकारिणीत साजिद शरीफ यांची जिल्हा संघटक प्रमुख, राकेश नेमणवार यांची केळापूर तालुकाप्रमुख, अतिश चव्हाण यांची पांढरकवडा शहरप्रमुख, प्रफुल जीड्डेवार यांची शहर संघटक, संतोष बोडेवार यांची तालुका संघटक तर अॅड अजय कोठेवार यांची शहर समन्वयक पदी निवड झाली आहे. नवीन पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जिल्हा तथा तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी वर्ग, तरुणवर्ग आणि सामान्य जनता शिवसेना शिंदे गटासोबत उभी आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवणे आणि जनतेच्या समस्या सोडवणे हेच आमचे प्राधान्य असेल,” असेही त्यांनी नमूद केले. या सर्व नियुक्त्यांतून खेतानी फाउंडेशनचे सर्वेसर्वा सलीम भैय्या खेतानी यांची छाप प्रकर्षाने जाणवत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन आणखी जोमाने कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. खेतानी फाउंडेशनच्या “जनसेवा हीच ईश्वर सेवा या तत्त्वावर संघटना कार्यरत राहणार असल्याचेही पदग्रहण समारंभात अधोरेखित करण्यात आले. या नव्या निवडींमुळे संपूर्ण जिल्ह्यात, विशेषतः पांढरकवडा आणि केळापूर तालुक्यात, शिवसेना शिंदे गटात नवचैतन्य निर्माण झाले आहे.




