– ऑनलाईन नोंदणी, प्रिंटर बदल, मालकी हस्तांतरण प्रक्रिया रखडली
यवतमाळ :- नवीन वृत्तपत्रांची नोंदणी तसेच प्रिंटर बदल, मालकी हस्तांतरण यासारखी महत्त्वाची अनुषंगिक कामे ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी आवश्यक असलेली जिल्हाधिकारी कार्यालयाची प्रोफाईल अद्याप तयार करण्यात न आल्याने यवतमाळ जिल्ह्यातील अनेक वृत्तपत्रांची कामे गंभीरपणे खोळंबली आहेत.
नवी दिल्ली येथील रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया या संस्थेचे नाव वर्ष २०२३ पासून बदलून प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (PRGI) असे करण्यात आले असून, ऑफलाईन कार्यपद्धती पूर्णतः बंद करून सर्व प्रक्रिया ऑनलाईन व आधार-आधारित करण्यात आल्या आहेत. मात्र या नव्या प्रणालीअंतर्गत आवश्यक असलेली जिल्हाधिकारी कार्यालयाची अधिकृत प्रोफाईल PRGI च्या संकेतस्थळावर अद्याप तयार करण्यात आलेली नाही.
या बाबत स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर असोसिएशन ऑफ पुणे (नोंदणी क्र. १५३६) चे संस्थापक सचिव तसेच यवतमाळ गॅझेटचे संपादक ईश्वरसिंह रतनसिंह सेंगर यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नव्या कायद्यानुसार PRGI कडून देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना त्यांच्या अधिकृत ई-मेलवर प्रोफाईल आयडी व पासवर्ड पाठविण्यात आले आहेत. मात्र यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप त्या आधारे प्रोफाईल तयार करण्यात आलेली नसल्यामुळे वृत्तपत्रांना आवश्यक असलेली ऑनलाईन एनओसी (मंजुरी) मिळत नाही. परिणामी अनेक वृत्तपत्रांचे प्रकाशन, कायदेशीर प्रक्रिया व इतर प्रशासकीय कामे अडचणीत सापडली आहेत.
या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेता PRGI च्या संकेतस्थळावर जिल्हाधिकारी कार्यालयाची प्रोफाईल तातडीने तयार करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (PRGI), नवी दिल्ली यांनाही पाठविण्यात आली आहे.




