– जमीनी कार्यकर्त्यांचा सूर; शौकत अली बागवान यांची केजरीवालांकडे स्पष्ट मागणी
कामठी :- आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारचे निवडणूक गठबंधन न करता आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, अशी ठाम मागणी आम आदमी पार्टीचे नागपूर जिल्हा संघटनमंत्री शौकत अली बागवान यांनी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्रातील पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
INDIA आघाडीच्या काळात आघाडीच्या निर्णयाचा सन्मान करत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेससह आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने काम केले. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या विजयात आघाडीतील कार्यकर्त्यांच्या मेहनतीसोबत ‘आप’च्या कार्यकर्त्यांच्या योगदानालाही महत्त्व आहे, असे बागवान यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
मात्र, निवडणुकीच्या काळात ‘आप’चे कार्यकर्ते आघाडीधर्म पाळत असतील, तर निवडणुकीनंतर त्याच पद्धतीने राजकीय सहकार्य आणि सन्मान मिळतो का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
‘वारंवारच्या गठबंधनामुळे स्वतंत्र ओळख धोक्यात’
केवळ निवडणुकीच्या राजकीय समीकरणांनुसार वारंवार गठबंधन करणे हे आम आदमी पार्टीच्या संघटनात्मक विस्तारासाठी आणि स्वतंत्र राजकीय ओळखीसाठी घातक ठरू शकते, अशी भूमिका बागवान यांनी मांडली.
भ्रष्टाचारविरोध, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष ही आम आदमी पार्टीची प्रमुख ओळख आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या आधारावर नव्हे, तर स्वतःची संघटनशक्ती, विचारधारा आणि कार्यकर्त्यांच्या बळावर विस्तार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते मर्यादित साधनसामग्रीत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभा आणि लोकसभा स्तरापर्यंत पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा-पुन्हा दुसऱ्या पक्षाच्या सहाऱ्याने निवडणूक लढल्यास ‘आप’ला स्वतःच्या संघटनेवर विश्वास नाही, असा चुकीचा संदेश कार्यकर्ते आणि जनतेमध्ये जाऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
‘आत्ताच स्वबळाची घोषणा करा’
पक्ष नेतृत्वाने आतापासूनच ‘आम आदमी पार्टी महाराष्ट्रात आपल्या कार्यकर्त्यांच्या, संघटनेच्या आणि विचारधारेच्या बळावर स्वबळावर निवडणूक लढेल’, अशी स्पष्ट भूमिका जाहीर करावी. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण होईल आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाला पुरेसा वेळ मिळेल, असे बागवान यांनी म्हटले आहे.
संघटन मजबूत करण्यासाठी सात मागण्या
बागवान यांनी पक्ष नेतृत्वाकडे काही ठोस मागण्या मांडल्या आहेत. त्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची रणनीती निश्चित करणे, प्रत्येक जिल्ह्यात संघटन बळकट करण्यासाठी विशेष अभियान राबविणे, जमीनी कार्यकर्त्यांना निर्णयप्रक्रियेत योग्य स्थान देणे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सक्षम उमेदवारांची आतापासूनच चाचपणी करणे, ‘आप’ची विचारधारा गावागावात पोहोचविणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पक्षविस्ताराचे माध्यम बनविणे यांचा समावेश आहे.
तसेच ‘आप’ची स्वतंत्र ओळख आणि ‘झाडू’ या निवडणूक चिन्हाला जनमानसात अधिक बळकटी देण्यासाठी व्यापक जनसंपर्क अभियान राबविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
‘काँग्रेसच्या विरोधासाठी नव्हे, ‘आप’च्या भविष्यासाठी भूमिका’
“आम्ही काँग्रेसच्या विरोधासाठी ही भूमिका मांडत नाही. आम आदमी पार्टी महाराष्ट्रात स्वतःच्या पायावर उभी राहावी, कार्यकर्त्यांच्या मेहनतीला योग्य दिशा मिळावी आणि पक्षाची स्वतंत्र राजकीय ओळख अधिक मजबूत व्हावी, यासाठी ही मागणी आहे,” असे बागवान यांनी स्पष्ट केले.
कठीण परिस्थितीतही महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडलेली नाही. मर्यादित संसाधनांमध्ये जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर पक्षाने विश्वास ठेवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
“गठबंधनाची मजबुरी नको, कार्यकर्त्यांच्या ताकदीवर विश्वास हवा; दुसऱ्यांच्या सहाऱ्याचे राजकारण नको, महाराष्ट्रात ‘आप’ची स्वतंत्र ओळख हवी,” असा स्पष्ट संदेश शौकत अली बागवान यांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे





