किशोर साहू, मौदा, ता.१३:- मौदा येथील नगरपंचायत निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात 10 नोव्हेंबर पासून झाली. 10 नोव्हेंबरला एकही उमेदवारी अर्ज न दाखल झाल्यामुळे उमेदवारी अर्जविना निरंक गेला. तसेच 11 नोव्हेंबरला सुद्धा एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे निरंक आहे. उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे. मौदा नगरपंचायत साठी कुठल्याही राजकीय पक्षांनी उमेदवाराच्या नावाची घोषणा न केल्यामुळे व संभाव्य उमेदवार कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी तहसील कार्यालय व नगरपंचायत कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.शहरातील नागरिकांमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी कोण उभे राहणार या चर्चेला उधाण आले आहे.
मौदा नगरपंचायतीमध्ये एकूण 17 प्रभाग असून 13734 मतदारांची संख्या आहे. 17 तारीख नामांकन भरण्याची शेवटची असल्याने इच्छुकामध्ये जनुशर्यत पाहायला मिळत आहे. नगराध्यक्ष पदाकरिता भाजप पक्षाकडून माजी नगराध्यक्षांचे पती तथा माजी नगरसेवक राजू सोमनाथे , भाजप शहराध्यक्ष मोरेश्वर सोरते, भाजपा शहर महामंत्री प्रकाश कुहिकर,माजी नगरसेविकेचे पती तथा माजी भाजपा कार्याध्यक्ष रमेश कुंभलकर आणि जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा मौदा येथे छोटे अंबानी म्हणून प्रसिद्ध असलेले बांधकाम साहित्य पुरवठादार मनीराम यादव, महसूल मंत्री बावनकुळे यांचे स्वीय सहाय्यक राहुल पोटभरे तसेच काँग्रेस पक्षाकडून माजी नगर उपाध्यक्ष राजेश निनावे , काँग्रेस शहराध्यक्ष शुभम तिघरे , काँग्रेस महासचिव प्रसन्ना (राजा) तिडके, माजी नगरसेवक किशोर सांडेल , राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून मृणाल तिघरे तर अपक्ष म्हणून माजी प्रथम नगराध्यक्ष उमेश गभने आदींसह नगराध्यक्षपदाच्या शर्यतीच्या चर्चेत आहेत.








