spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अवयवदान जनजागृती अभियान पंधरवड्याला नागपुरात सुरुवात

– पाचपावली सुतीका गृह येथे मनपातर्फे अभियानाचा शुभारंभ

– ३ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘अवयवदान पंधरवडा’

नागपूर :- शासनाच्या वतीने ३ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘अवयवदान पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. या अभियानाला नागपूर शहरात व्यापक स्वरूप देण्यात आले असून, शहरातील प्रत्येक रुग्णालयात अवयवदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पाचपावली सुतीका गृह येथे अवयवदान जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमात मनपाच्या वैद्यकीय आरोग्य समितीच्या सभापती मनीषा अतकरे, आशीनगर झोनचे सभापती शेख, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार ,स्त्रीरोग तज्ज्ञ व पाचपावली सुतीकागृह चे प्रमुख डॉ. कांचन किम्मतकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.माने, डॉ.वैशाली मोहकर, पी.एच.एन. दिपाली गणोरकर आशा वर्कर व संबधीत कर्मचारी , अधिकारी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेच्या महापौर निता ठाकरे यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती  शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, वैद्यकीय आरोग्य सभापती मनिषा अतकरे, आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सरला लाड आणि साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांच्या देखरेखीखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मनपाच्या वैद्यकीय आरोग्य समितीच्या सभापती  मनीषा अतकरे यांनी अवयवदानाचे महत्त्व विषद केले. अवयवदान हे मानवतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि निःस्वार्थ कार्य असून, एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे नागरिकांनी अवयवदानाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन या जनहितकारी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार यांनी अवयवदानाबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपल्या देशात दरवर्षी हजारो रुग्ण हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस तसेच इतर महत्त्वपूर्ण अवयवांच्या प्रत्यारोपणाची प्रतीक्षा करतात. मात्र, वेळेवर अवयव उपलब्ध न झाल्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. अशा प्रत्येक रुग्णासाठी एक अवयवदाता ही नवी आशा, नवे जीवन आणि नवे भविष्य घेऊन येतो. “अवयवदान ही मानवतेच्या महान आणि निःस्वार्थ सेवांपैकी एक आहे. मृत्यूनंतरही आपल्या अवयवांच्या दानातून अनेकांना नवजीवन मिळू शकते. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात आणि अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलू शकतो,” असे डॉ. बहिरवार यांनी सांगितले.

अवयवदानाबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी मनपाच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणि संबंधित यंत्रणांकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, या अभियानाची खरी सफलता नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच साध्य होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेऊन अवयवदानाचा संकल्प करावा तसेच आपल्या कुटुंबीय, मित्र आणि परिचितांनाही यासाठी प्रेरित करावे असे आवाहन डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी केले.

“मृत्यू हा जीवनाचा शेवट असला, तरी आपल्या अवयवदानामुळे एखाद्या व्यक्तीसाठी नव्या जीवनाची सुरुवात होऊ शकते. चला, अवयवदानाचा संकल्प करूया, जीवन वाचवूया आणि मानवतेच्या या महान सेवेत सहभागी होऊया,” असे आवाहन मनपाचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कांचन किम्मतकर यांनी केले. दरम्यान, ३ ते १५ ऑगस्टदरम्यान नागपूर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती, मार्गदर्शन आणि नागरिकांना अवयवदानाचा संकल्प करण्यासाठी प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.