spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

श्री आयुर्वेद महाविद्यालयात अवयवदान जनजागृती अभियान उत्साहात संपन्न

नागपूर :- राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त श्री आयुर्वेद महाविद्यालय व पक्वासा समन्वय रुग्णालय, नागपूर येथे “अवयवदान जनजागृती अभियान” अंतर्गत विशेष जनजागृती व्याख्यान व अवयवदान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या पी.जी. हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या वीणा वाठोरे Project Manager, Multi Organ Hope & Advocacy Network (MOHAN), Nagpur यांनी अवयवदानाचे सामाजिक, नैतिक व वैद्यकीय महत्त्व, ब्रेन स्टेम डेथ ही संकल्पना, अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया, तसेच अवयवदानाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. मृत्यूनंतर अवयवदानाद्वारे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, हा अत्यंत प्रेरणादायी संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. तसेच प्रत्येक नागरिकाने अवयवदानाविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बृजेश मिश्रा हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. आपल्या मनोगतात त्यांनी अवयवदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असून, समाजात याबाबत व्यापक जनजागृती होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी अवयवदानाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रचना शारीर विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख प्रा. डॉ. विनोद एम. चौधरी उपस्थित होते. त्यांनी अवयवदानाविषयी जनजागृतीसाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करत, समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.यावेळी रचना शारीर विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. शिल्पा वराडे यांनी अवयवदानाची प्रस्तावना व महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना अवयवदानाचे सामाजिक उत्तरदायित्व समजावून सांगितले. तसेच डॉ. शुभांगीनी वरटकर यांनी ‘अवयवदान हे श्रेष्ठदान’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अवयवदान जनजागृती कार्यक्रमात डॉ. मोना गायकवाड यांनी आपल्या जीवनातील प्रेरणादायी अनुभव कथन केला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या सख्ख्या बहिणीने मूत्रपिंड दान केल्यामुळे त्यांच्यावर यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण होऊन त्यांना नवजीवन मिळाले. त्यांनी उपस्थितांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देत, अधिकाधिक नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नूतन तायनाथ यांनी प्रभावीपणे केले, तर डॉ. यामिनी शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी आयोजित अवयवदान प्रदर्शनी हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. प्रदर्शनीमध्ये विविध अवयवांची माहिती, ब्रेन स्टेम डेथची संकल्पना, अवयवदानाची प्रक्रिया, प्रत्यारोपणाविषयी वैज्ञानिक माहिती तसेच अवयवदानासंबंधी जनजागृती करणारे माहितीफलक व शैक्षणिक साहित्य प्रदर्शित करण्यात आले. उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवयवदानाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा घेऊन अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचा व समाजात या उदात्त कार्याचा संदेश पोहोचविण्याचा संकल्प केला. उपस्थितांनी अवयवदानाचे महत्त्व जाणून घेत सकारात्मक प्रतिसाद नोंदविला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थी, इंटर्न, पदवीचे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील रचना शरीर विभागातील पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी डॉ. गणेश सुर्वे, डॉ.शुभम झोडपे , डॉ.आदिनाथ रावते , डॉ. जयंत केवट, डॉ. जानवी यादव, डॉ. मोना गायकवाड, डॉ. निकीता सोनोने, डॉ. प्राजक्ता भालकर, डॉ. तनझिला अहमद, डॉ. पायल कारले या रचना शारीर विभागाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले व्याख्यानानंतर उपस्थितांच्या विविध शंकांचे समाधान करण्यात आले. अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.

Popular Articles