spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संत सावता माळी यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘मी सावता बोलतोय’ पुस्तकाचे १० ऑगस्ट रोजी सोलापुर जिल्ह्यातील (अरण) येथे प्रकाशन

नागपूर :- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन संतश्रेष्ठ सावता माळी यांच्या जीवनकार्य, कर्मयोग, विठ्ठलभक्ती आणि सामाजिक समतेचा विचार प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘मी सावता बोलतोय’ या आगळ्यावेगळ्या पुस्तकाचे प्रकाशन दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी संत सावता माळी मंदिर, सोलापूर जिल्हयातील (अरण) येथे संपन्न होणार आहे. हे पुस्तक ‘श्री माळी वैभव’ मासिकाचे संपादक, ज्येष्ठ लेखक व अभ्यासक मनोहर गणपतराव चलपे यांनी लिहिले असून, संत सावता माळी यांच्या जीवनाचा प्रवास त्यांच्या आत्मकथनाच्या शैलीत उलगडण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे. पुस्तकामध्ये संत सावता माळी यांचा कर्मयोग, कृषिसाधना, विठ्ठलभक्ती, सामाजिक समतेचा संदेश आणि आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी जीवनदृष्टी प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे वाचकांना जणू संत सावता माळी स्वतःच आपल्या जीवनातील प्रसंग, विचार आणि समाजप्रबोधनाचा संदेश सांगत आहेत, असा अनुभव पुस्तक वाचताना येतो. त्यामुळे हे पुस्तक संत साहित्याचा अभ्यास करणारे संशोधक, विद्यार्थी, वारकरी, भक्त तसेच सर्वसामान्य वाचकांसाठी महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन संत सावता माळी यांच्या आठव्या पिढीतील वंशजांच्या हस्ते तसेच अरण येथील परंपरागत विद्यमान पुजारी यांच्या शुभहस्ते होणार आहे. या सोहळ्यास संत साहित्य अभ्यासक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. लेखक मनोहर चलपे हे नागपूर येथील रहिवासी असून त्यांनी साहित्य, समाजप्रबोधन आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या लेखणीतून यापूर्वी ‘मानवी मूल्यांचे शिक्षण’, ‘म. फुल्यांच्या गोष्टी’, ‘मी सावित्री माझी कर्मकहाणी’, ‘सत्यशोधक विवाह विधी’, ‘क्रांतीसूर्य महात्मा फुले’, ‘ज्योती मानवधर्म संदेश’ आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘मी सावता बोलतोय’ हे पुस्तक संत सावता माळी यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रेरणादायी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारे महत्त्वपूर्ण साहित्य ठरेल, असा विश्वास लेखकांनी व्यक्त केला आहे.

Popular Articles