हंसराज,प्रतिनिधी भंडारा पालांदूर :- भंडारा जिल्ह्यातील पालांदूर पोलीस स्टेशनच्या पथकाने गस्तीदरम्यान पालेपेंढरी परिसरात मोठी कारवाई करत बेकायदेशीरपणे धारदार शस्त्र बाळगून चारचाकी वाहनाने फिरणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पैदोर, पोलीस शिपाई वनवे आणि कर्मचारी पालेपेंढरी परिसरात गस्त घालत असताना त्यांना एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा एसयूव्ही कार (क्र. एम.एच. १२ एच.टी. ७१७१) संशयास्पदरित्या फिरताना आढळली. पोलिसांनी दोन पंचासमक्ष गाडीची झडती घेतली असता, त्यांच्याकडे ४३ सेंटीमीटर लांबीचा एक मोठा धारदार लोखंडी चाकू मिळून आला. पोलिसांनी अंदाजे २०० रुपये किमतीचा चाकू आणि ४ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ४ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी उमेश दादाराव कारमोरे (वय २६, रा. हुडपा, ता. कुही; हल्ली बेलाटी, ता. लाखांदूर), राजेंद्र अनिल बखेडीकर (वय २७, रा. पोहा, ता. लाखनी) आणि सभौर संजू थोके (वय २६, रा. बेलाटी, ता. लाखांदूर) या तिघांविरुद्ध अपराध क्रमांक ६६/२०२६ नुसार भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहायक पोलीस निरीक्षक बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पैदोर आणि पालांदूर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली असून पुढील तपास पालांदूर पोलीस करीत आहेत.




