-छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत कामठी तालुक्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवाडा
कामठी :- महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख ,कार्यक्षम व पारदर्शक होण्याकरिता राष्ट्रनेता , भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगामी जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये कामठी तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंढरवाडा साजरा करण्यात येत आहे. अशी माहिती कामठी चे तहसीलदार गणेश जगदाळे यांनी दिली .
या पंढरवाड्या अंतर्गत सदर अभियानातून तीन टप्प्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यात 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान पांदण रस्तेविषयक मोहीम राबविण्यात येणार आहे.या अंतर्गत कामठी तालुक्यातील सर्व पांदण व शिव रस्त्याना विशिष्ट क्रमांक देण्याबाबत कार्यवाही सुरू असून सदर मोहीम अंतर्गत शिव व पांदण रस्त्याचे सर्वेक्षण केले जात आहे.तसेच ज्या पानंद रस्त्याची नोंद विस्तार पत्रकात नाही त्याची नोंद घेणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमती पत्र घेणे,रस्ता अदालत आयोजित करून शेत रस्त्याचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे,शेत रस्त्याची मोजणी व सीमांकन करण्याची कार्यवाही महसूल विभागाकडून केली जात आहे त्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे तसेच सर्व रस्त्यावरील अतिक्रमणे या कालावधीत निष्कासित केली जाणार असल्याने 17 सप्टेंबर रोजी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व रस्त्याची चावडी वाचन करण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात 23 ते 27 सप्टेंबर या कालावधीत सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील 2011 पूर्वीचे अतिक्रमणे नियनानूकुल पट्टे वाटप करण्यात येणार आहे.तिसऱ्या टप्प्यात 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.या अंतर्गत कामठी तालुक्यातील 77 गावामधील चुकून भोगवटदार वर्ग 2 असलेली शेत जमीन मंडळ निहाय मोहीम राबवून भोगवटदार वर्ग 1 करण्यात येणार आहे तसेच गाव तिथे स्मशानभूमी ,दफनभूमी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे व संजय गांधी निराधार योजना समिती चे बैठक ग्रामपंचायत स्तरावर घेऊन पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यात येणार आहे.तसेच पांदण रस्त्यावरील सण 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियनामुकुल करण्यात येणार आहे.तरी कामठी तालुक्यातील नागरिकांनी या सेवा पंढरवाडा अभियानाचा पूर्णपणे लाभ घ्यावा असे आवाहन कामठी चे तहसिलदार गणेश जगदाळे यांनी केले आहे.




