पांढरकवडा :- नागपूरहून तेलंगणा राज्याकडे कथितरीत्या अवैध पद्धतीने वाहतूक करण्यात येत असलेल्या ३७ गोवंशांची पांढरकवडा पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशाची किंमत सुमारे १५ लाख ९५ हजार रुपये, तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या लाल रंगाच्या टाटा ट्रकची किंमत १५ लाख रुपये, असा एकूण ३० लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती प्रथम खबरी अहवालातून समोर आली आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, एम.एच. ३४ ए.बी. ९७७१ क्रमांकाच्या ट्रकमधून गोवंशाची वाहतूक करण्यात येत होती. वाहतुकीदरम्यान जनावरांना हालचालीस पुरेशी सुरक्षित जागा नसणे, जखमी होण्याची शक्यता निर्माण होणे, खाद्य-पाण्याची योग्य व्यवस्था नसणे तसेच जनावरांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी अमीर अली असलम अली (वय ३१, व्यवसाय चालक), सरफराज समद खान (वय २९, व्यवसाय मजुरी) आणि शेख समद शेख जमील (वय ४५) यांच्याविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गोवंश नागपूर येथून पांढरकवडा मार्गे तेलंगणा राज्यात नेण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ तसेच प्राण्यांना क्रूरतेपासून प्रतिबंध अधिनियम १९६० मधील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार सुनील कुंटावार यांच्याकडे सोपविला आहे. सुटका करण्यात आलेल्या गोवंशांना इंदिरा नगरला लागून असलेल्या अधिकृत श्री गोसंरक्षण केंद्रात ठेवण्यात आल्याचेही अहवालात नमूद आहे. तसेच जनावरांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी संबंधित तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आल्याची माहिती आहे.
या कारवाईमुळे गोवंश वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट झाले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक एल.डी तावरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.





