गडचिरोली :- जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दिनांक 06 मे 2026 रोजी PCOD (Polycystic Ovarian Disease) क्लिनिकचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या उपक्रमामुळे पीसीओडीग्रस्त मुली व महिलांना नियमित व तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.
आजकाल अनेक मुली व महिलांना PCOD या समस्येचा सामना करावा लागत असून मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर अनावश्यक केस येणे, मुरूम येणे तसेच गर्भधारणेमध्ये अडचणी निर्माण होणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. योग्य आहार, नियमित व्यायाम, समुपदेशन व वेळेवर वैद्यकीय उपचारांच्या माध्यमातून या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.
महिलांना योग्य उपचार, समुपदेशन, आहार व जीवनशैलीबाबत नियमित मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हे विशेष PCOD क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मानसी कांबळे या दर बुधवारी पीसीओडीग्रस्त मुली व महिलांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे उपस्थित होत्या. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबरीश तिवारी, डॉ. इंद्रजीत नागदेवते, डॉ. मनीष मेश्राम, डॉ. बागराज धुर्वे, श्रीमती आशा बावणे सहाय्यक अधिसेविका तसेच नर्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या श्रीमती मेघा कुलसुंगे उपस्थित होत्या. कार्यक्रमास नर्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या पाठ्यनिर्देशिका, नर्सिंग विद्यार्थी तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. वर्षा लहाडे यांनी PCOD हा महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणारा आजार असून योग्य वेळी निदान, संतुलित आहार, नियमित व्यायाम व सकारात्मक जीवनशैलीच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण मिळवता येते, असे मार्गदर्शन केले. तसेच महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहून कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नर्सिंग प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी, विद्यार्थी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. असे जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय गडचिरोली डॉ. वर्षा लहाडे यांनी कळविले आहे.