नागपूर :- १० फेब्रुवारी रोजी पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड व संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी प्लंबर व मेसन (गवंडी) व्यवसायातील विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूर येथील पुरुषोत्तम जी देवतळे साहेब यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास श्वेता कुलकर्णी, उपसंचालक, नागपूर आयटीआय, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी योगेश पाटील, उपव्यवस्थापक, पिडिलाइट, अनोष डोमासिया व त्यांची टीम, व्यवसाय व्यवस्थापक, पिडिलाइट; श्रुती मोरे व त्यांची टीम; तसेच मोहसिन शेख (डॉ.फिक्सिट टीम) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जयंत टालाटुले अविनाश केने, शिवाजी ढुमणे सिद्धार्थ मेहरे, प्रकाश वाढई (सर्व गट निदेशक) तसेच संबंधित व्यवसायाचे शिल्प निदेशक इंद्रभूषण बेलसरे, प्रभाकर मुंडे व पेटकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उद्योगतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्लंबिंग व बांधकाम क्षेत्रातील करिअर संधी व कौशल्य विकासाबाबत सविस्तर माहिती दिली.
मार्गदर्शन सत्रे पुढीलप्रमाणे :
यगेश पाटील यांनी पिडिलाइटच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांबाबत व कौशल्यविकास कार्यक्रमांविषयी माहिती देत युवक सक्षमीकरणावर भर दिला. जीवन राजूरकर, प्लंबिंग अभियंता व कंत्राटदार, यांनी प्लंबिंग व बांधकाम क्षेत्रातील रोजगार व उद्योजकतेच्या संधी स्पष्ट केल्या अनोष डोमासिया व विशाल यांनी ‘रॉफ’ उत्पादनांची माहिती देत बांधकाम उद्योगातील त्यांचे उपयुक्त उपयोग समजावून सांगितले. सौ. श्रुती मोरे व नविद यांनी विविध प्लंबिंग उत्पादनांची माहिती व त्यांचा प्रत्यक्ष वापर विद्यार्थ्यांसमोर मांडला. मोहसिन शेख यांनी डॉ. फिक्सिटच्या वॉटरप्रूफिंग व बांधकाम रसायनांबाबत माहिती देत आधुनिक बांधकामातील त्यांचे महत्त्व विशद केले. संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर येथील प्लंबर व मेसन व्यवसायातील एकूण ३० माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात सहभाग नोंदविला. कार्यरत माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप कुणाल जाधव, कौशल्य पर्यवेक्षक,यांनी आभारप्रदर्शनाने केला. त्यांनी सर्व मान्यवर व सहभागींचे सहकार्य व उपस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा माजी विद्यार्थी मेळावा यशस्वी ठरला असून, विद्यार्थ्यांना उद्योगतज्ज्ञांशी संवाद साधण्याची तसेच प्लंबिंग व बांधकाम क्षेत्रातील करिअर संधी जाणून घेण्याची मोलाची संधी प्राप्त झाली.




