आषाढी एकादशी म्हणजे पंढरीचा मानाचा दिवस. आपल्या या विठुरायाचे दर्शन घेण्याच्या लगबगीने सारे वारकरी वारी करीत पंढरीची पायी वाटचाल करीत असतात. टाळ मृदुंग, ग्यानबा तुकाराम, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल या जयघोषात या विठुरायाचे नामस्मरण करीत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होताना दिसतात.
प्रत्येक विठ्ठलभक्ताला आपल्या देवाचे दर्शन व्हावे असे वाटत असते. परंतु प्रत्येकालाच वारीला जाण्याची संधी मिळेलच असे नाही. असंच मुंबईकरांच्या बाबतीत काही दिसून येते. मुंबई मधील भक्तांना या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. अशावेळी हे भक्त मुंबईतील वसलेल्या वडाळा गावांत ” श्री. प्रतिपंढरपूर ” या मंदिरात वारी काढतात. मुंबईतील पंढरीत टाळ मृदुंगाचा नाद, वैष्णवांचा मेळा, भगवा पताका, विद्युत रोषणाई हे सारे दृश्य पाहायला मिळते. अशाच मुंबईतील प्रसिद्ध प्रतिपंढरपूर ” म्हणजेच वडाळा गांवातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर. मंदिराचा विस्तार वाढवण्यात आला असून मंदिराचा कळस हा भागवतभक्त सोनोपंत दांडेकर यांनी बसवला होता असे सांगितले जाते.
मुंबईतील ज्यांना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी हे मंदिर एक प्रतिपंढरपूर म्हणून उभे आहे. मंदिरात आषाढी एकादशीला लाखो भाविकांची गर्दी दिसून येते. मुंबईतील कुलाबा आणि अनेक ठिकाणाहून येथे वारक-यांच्या दिंड्या येतात. जत्रेचा उत्साह ही असतो. असे हे मंदिर पूर्वाभिमुख असून संपूर्ण संगमरवरी आहे. मंदिरात प्रथम प्रवेश करताना आपल्या नजरेस पडते ती काळ्या पाषाणातील गरुड देवाची मूर्ती, बाजूला शनी देवाचे मंदिर, आत गेल्यावर श्री. मारुतीरायाची मूर्ती, पुढे गेल्यानंतर मुख्य गाभा-यात दर्शन घडते सुंदर काळ्या पाषाणातील विविध आभूषणे आणि अलंकाराने नटलेली विठ्ठल-रखुमाईची मूर्ती. या मंदिरच्या उजव्या बाजूला महादेवाचे मंदिर असून डाव्या बाजूला श्रीदत्त, देवीचे गणपतीचे मंदिर आहे, मंदिरात पहाटे काकड आरती, दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता आरती तर रात्री ९.३० वाजता शेजारती होत असून दररोज सायंकाळी ५ ते ७ वाजता आणि रविवारी ४ ते ७ हरिपाठ प्रवचन असा हा मंदिराचा कार्यक्रम असतो. दशमीपासून भजन सुरु होऊन ते आषाढी एकादशीच्या रात्री पर्यंत भजन सुरु असते. आषाढीला लाखो वैष्णवांचा मेळा भरतो. संपूर्ण मंदिर हरिनामाच्या जपाने दुमदुमून जातो. मंदिरातील विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची पूजा आषाढी एकादशीला राजकीय पुढारी व्यक्तींच्या हस्ते केली जाते.
मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी हे एक विठ्ठल रुक्मिणी मंदिर. मंदिर पुरातन असून जवळ जवळ ४०० वर्षे जुने आहे. या मंदिराच्या स्थापनेविषयाची गोष्ट ऐकण्यासारखी आहे. पूर्वी मुंबई हि सात बेटांची होती. त्यातील वडाळा हे एक बेट किंवा गांव. वडाळा गांव हे प्रसिद्ध होते, ते येथील मिठागरांसाठी. अशा या मिठागरात लमाणी, शेतकरी, कोळी, आगरी अशी अनेक लोक राहत होते. मिठाचा व्यापार करणे या त्यांचा व्यवसाय. व्यापार करणारे व्यापारी हे विठ्ठलाचे आणि तुकाराम महाराजांचे भक्त असून ते नित्यनियमाने वारीला पंढरपूरला जात असे. एक दिवशी काम करताना या मिठागरात काम करणा-या विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती सापडल्या. सदर घटना व्यापा-यांनी पंढरपुरास जाऊन तुकाराम महाराजांना सांगितली असे म्हणणे आहे, त्यांनी सांगितले या मुर्त्या ज्या ठिकाणी सापडल्या त्या ठिकाणी विठ्ठल-रखुमाईचे मंदिर स्थापन करा. व्यापा-यांनी त्या परिसरात एक तळ होतं तेथे मंदिर उभारले. मंदिराचा विकास होत गेला तस तसे या मंदिराचा पाय रचत गेला. आणि आज या मंदिरात गेल्यावर समाधान मिळाल्याशिवाय बाहेर येऊच शकत नाही. ही खरी मंदिराची ख्याती आहे. म्हणून हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर “श्री. प्रतिपंढरपूर ” तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.
लेखक – दिनेश जयराम हुमणे, डोंबिवली





