– पुण्यात जिम ट्रेनरकडून प्रतिबंधित इंजेक्शनचा साठा जप्त
पुणे :- शरीरसौष्ठवासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित औषधांच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात चतुःशृंगी पोलिसांनी मोठी कारवाई करत एका जिम ट्रेनरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्रीस बंदी असलेल्या मेफेन्टरमाइन सल्फेट इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणामुळे फिटनेसच्या नावाखाली सुरू असलेल्या धोकादायक प्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश राजेंद्र वाडेकर (वय ३७, रा. जनवाडी, पुणे) याच्याकडे प्रतिबंधित इंजेक्शन्सचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे अंमलदार सूर्यकांत मनकवडे आणि त्यांच्या पथकाने जनवाडी परिसरात सापळा रचून कारवाई केली. या वेळी आरोपीच्या ताब्यातून मेफेन्टरमाइन सल्फेट इंजेक्शन आयपीच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
प्राथमिक तपासात आरोपी कोणतीही अधिकृत परवानगी किंवा वैद्यकीय सल्ला नसताना आर्थिक फायद्यासाठी ही इंजेक्शने विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित औषध हे केवळ नोंदणीकृत वैद्यकीय तज्ज्ञांच्या लेखी प्रिस्क्रिप्शननंतरच उपलब्ध होऊ शकते. मात्र, कमी कालावधीत शरीरयष्टी विकसित करण्याच्या उद्देशाने काही तरुणांकडून अशा औषधांचा गैरवापर होत असल्याची बाब या कारवाईतून समोर आली आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या औषधांचा विनासल्ला किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा औषधांचा वापर केवळ वैद्यकीय देखरेखीखालीच करणे आवश्यक आहे.
या प्रकरणी संबंधित कायद्यांनुसार योगेश वाडेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त करण्यात आलेली इंजेक्शने त्याने नेमकी कुठून मिळवली आणि त्याचे इतर कोणाशी संबंध आहेत का, याचा पुढील तपास चतुःशृंगी पोलीस करीत आहेत…





