spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भेसळयुक्त मिठाई, कॅंडी व चॉकलेटचा ₹45 लाखांहून अधिक किमतीचा साठा जप्त

पुणे :- अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे शहरातील गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरात संयुक्त कारवाई करत निकृष्ट व संशयास्पद दर्जाच्या मिठाई, कॅंडी, चॉकलेट तसेच इतर खाद्यपदार्थांचा सुमारे ₹45 लाखांहून अधिक किमतीचा साठा जप्त केला. या कारवाईदरम्यान काही ठिकाणी अन्न परवान्याविना साठवणूक आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचेही आढळून आले.

एफडीएच्या पथकाने गणेश पेठ येथील वर्धमान एंटरप्रायझेस येथे छापा टाकून 813 किलो अण्णामलाई मिठाई, 1,296 किलो इमली जेली आणि 812 किलो लव्हली कॅंडी असा एकूण ₹17.82 लाखांचा साठा जप्त केला. प्राथमिक तपासात या उत्पादनांच्या साठवणुकीत तसेच लेबलिंगसंदर्भातील नियमांचे पालन करण्यात त्रुटी आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली.

याच परिसरातील न्यू पांडियन एंटरप्रायझेस येथून सोनपापडी, चिक्की आणि रसमलाई बर्फी यांसह सुमारे ₹58,620 किमतीचे खाद्यपदार्थ ताब्यात घेण्यात आले.

भवानी पेठेतील गुरुनानक हायस्कूलजवळील एका गोदामात अन्न परवान्याशिवाय मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचा साठा करण्यात आल्याचे आढळले. येथे 9,979 किलो सेंटर फील्ड कॅंडी आणि 4,346 किलो चॉकलेट वेफर रोल असा सुमारे ₹36.39 लाखांचा माल जप्त करण्यात आला.

दरम्यान, नाना पेठेतील विजय लक्ष्मी ट्रेडर्स आणि गोयल सेल्स येथून राईस, झिरो नंबर शेव, फरसाण, काजू, बदाम, मनुका आणि मटण मसाला यांसह सुमारे ₹67 हजार किमतीचा संशयास्पद खाद्यसाठा जप्त करण्यात आला.

एफडीएने जप्त केलेल्या सर्व खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित अन्नसुरक्षा कायद्यांनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

एफडीएचे सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, मिठाई, चॉकलेट, कॅंडी किंवा इतर पॅकबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यावरील लेबल, उत्पादनाची तारीख, ‘बेस्ट बिफोर’ कालावधी आणि आवश्यक माहिती तपासूनच खरेदी करावी. तसेच संशयास्पद दर्जाचे खाद्यपदार्थ आढळल्यास प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी.

Popular Articles