spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“एम.डी. तस्करांना पोलिसांचा दणका – पोलीस आयुक्त सिंगल यांची छत्रपती नगरातील एमडी तस्कराच्या फ्लॅटची पाहणे !

नागपूर १४ : पोलीस स्टेशन धंतोली अंतर्गत छत्रपतीनगर येथील श्री पूजा अपार्टमेंटमध्ये नुकतेच ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर शहर पोलिसांनी एम.डी. तस्करांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. काल दिनांक ११ जुलै २०२५ रोजी, गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक आणि सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने शुक्रवारच्या मध्यरात्री धाडसात कारवाई करत सहा आरोपींना ताब्यात घेतले.

या कारवाईमध्ये गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार राहुल उर्फ सचिन शंकर लेपसे (वय २४, रा. साईनगर दिघोरी) यास अटक करण्यात आली. नमूद आरोपीने मुंबईतील मिरा रोड येथून एम.डी. पावडर आणून ती विक्री करत असताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.

या एम.डी. तस्करीसाठी आरोपी सचिन अरुण घोडे (वय ४६, रा. सेंट्रल एक्सप्रेस कॉलनी, छत्रपतीनगर) याने पूजा अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट भाड्याने घेतला होता. आणि ह्याच फ्लॅटमध्ये हे आरोपी एम.डी.चा काळाबाजार करत होते.

नागपूर शहर पोलीस अंतर्गत सध्या “ऑपरेशन थंडर” मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचे दोन ठळक स्तंभ आहेत — एकीकडे जनजागृती, तर दुसरीकडे अमली पदार्थ तस्करांचा कायमस्वरूपी बंदोबस्त.

या मोहिमेबाबत नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल हे अत्यंत जागरूक व संवेदनशील आहेत. पोलीस स्टेशन धंतोली हद्दीतील या महत्त्वपूर्ण कारवाईत पोलीस आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून थेट सहभाग घेतल्याचे विशेष उल्लेखनीय आहे.

याची प्रचिती म्हणजे, दिनांक ११ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ८.०० वाजता पोलीस आयुक्त स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या समवेत पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) लोहित मतानी, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील, तसेच एन.डी.पी.एस. सेलचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

सदर भेटीदरम्यान पोलीस आयुक्तांनी पूजा अपार्टमेंटमधील संशयित फ्लॅटची बारकाईने पाहणी केली. अचानक पोलीस आयुक्त स्वतःच आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. आजूबाजूच्या नागरिकांना याची माहिती लागताच, त्यांच्या मनात आश्चर्य व भीतीची भावना निर्माण झाली.

ही भेट केवळ पाहणी नसून एक ठोस संदेश होता — नागरिकांनी आपल्या आजूबाजूला काय चालू आहे, याकडे सतत लक्ष ठेवावे. आपण कोणाला फ्लॅट अथवा घर भाड्याने देतो आहोत, याची काळजीपूर्वक शहानिशा करूनच तो देणे गरजेचे आहे.

डोळे झाकून, चौकशी न करता जर कुणाला भाड्याने घरे दिली तर त्याचा वापर अवैध धंद्यांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशा वेळी घरमालकही कायदेशीर अडचणीत सापडू शकतो.

पोलीस आयुक्तांच्या या थेट भेटीमागील मुख्य उद्देश हाच होता — नागपूर शहरातील प्रत्येक नागरिकाने सुजाण नागरिक म्हणून आपल्या परिसरात घडणाऱ्या घटनांकडे सतर्कतेने लक्ष द्यावे, आणि काहीही संशयास्पद वाटल्यास डायल ११२ किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्वरित माहिती द्यावी.

फक्त जागरूक नागरिकांच्या सहकार्यानेच आपण अशा एम.डी. तस्करांच्या टोळ्यांचा पर्दाफाश करू शकतो.

एकंदरीत, नागपूर शहर पोलीस ऑपरेशन थंडर अंतर्गत केवळ कारवाई करत नाहीत तर समाजजागृतीही करत आहेत. नुकत्याच साजऱ्या झालेल्या अमली पदार्थविरोधी सप्ताहात कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि ते विधिपूर्वक नष्टही करण्यात आले.

या उपक्रमानंतर देखील ऑपरेशन थंडर थांबणार नाही, तर त्याला अजून अधिक धारदार व सखोल स्वरूप देण्याचा प्रयत्न नागपूर पोलिसांकडून सुरू आहे.

या कारवाईद्वारे पोलीस आयुक्तांनी छत्रपती नगर येथील फ्लॅटमध्ये जाऊन एक स्पष्ट संदेश दिला —
“सतर्क रहा, सजग बना आणि आपल्या शहराच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलासोबत खंबीरपणे उभे रहा!


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.