spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पोलीस दलाची शिस्त आणि विद्यार्थ्यांशी हितगूज; विशेष पोलीस महानिरीक्षकांचा भंडारा दौरा संपन्न

-‘पोलीस दरबारात’ कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवारण; ‘दिशा’ प्रकल्पातील तरुणांना दिले यशाचे मंत्र

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सन २०२५-२०२६ या वर्षाच्या वार्षिक निरीक्षणासाठी १० फेब्रुवारी रोजी भंडारा जिल्हा पोलीस दलाला भेट दिली. दिवसभर चाललेल्या या भरगच्च कार्यक्रमात त्यांनी संचलन, गुन्हे आढावा, कर्मचाऱ्यांशी संवाद आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करत पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचा आढावा घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता पोलीस मुख्यालयातील परेड ग्राउंडवर दिमाखदार संचलनाने झाली. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सलामी स्वीकारल्यानंतर परेडचे निरीक्षण केले. यावेळी पी.टी. परेड, मेडिसिन बॉल, स्क्वॉड ड्रिल, रायफल ड्रिल आणि ‘माँब डिस्पोजल’ (जमावाला पांगवणे) ड्रिलचे सादरीकरण करण्यात आले. या संचलनात जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार आणि शाखा प्रभारी अधिकारी पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते.

सकाळी ९ वाजता पोलीस बहुउद्देशीय हॉलमध्ये ‘पोलीस दरबार’ भरवण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी आपल्या अडीअडचणी थेट महानिरीक्षकांसमोर मांडल्या. महानिरीक्षकांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि त्यांच्या रास्त मागण्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

सकाळी १० वाजता ‘SP १००’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सेवाभावी संस्था (NGO), औद्योगिक आस्थापनांचे अधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिकांसोबत विशेष बैठक पार पडली. लोकसहभागातून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कशी अधिक बळकट करता येईल, यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

दुपारच्या सत्रात आयोजित ‘गुन्हे आढावा बैठकी’त जिल्ह्यातील गुन्हेगारीची स्थिती आणि तपासातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित सत्र न्यायालयीन गुन्हे आणि तपासातील तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. महानिरीक्षकांनी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद गतीने करून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याच्या सूचना दिल्या.

नूतन बॅरेकचे उद्घाटन आणि ‘दिशा प्रकल्प भेट

दिवसाच्या अखेरीस महानिरीक्षकांच्या हस्ते पोलीस मुख्यालयातील नूतनीकरण केलेल्या पुरुष बॅरेकचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी भंडारा पोलिसांच्या ‘दिशा’ प्रकल्पाला भेट दिली. येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी यशाचे कानमंत्र दिले आणि करिअरसाठी योग्य दिशा निवडण्याचे मार्गदर्शन केले.

या वार्षिक निरीक्षणामुळे भंडारा पोलीस दलाला भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवी ऊर्जा आणि दिशा मिळाल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.