spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बालिकेला न्यायासाठी प्रहार संघटना आक्रमक

– अंगणवाडीतील ३ वर्षीय बालिकेवर अत्याचार प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

– दोषींवर कठोर कारवाईसह ३० लाखांच्या मदतीची मागणी

भंडारा शहरातील अंगणवाडी केंद्र क्र. ४ येथे ३ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार व बलात्काराच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ प्रहार संघटना आक्रमक झाली असून जिल्हाधिकारी, भंडारा यांना निवेदन देण्यात आले. या अमानुष घटनेतील आरोपीस कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी तसेच पीडित बालिकेला तातडीने न्याय व आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

अवघ्या ३ वर्षीय निष्पाप बालिकेवर झालेली ही घटना मानवतेला काळिमा फासणारी असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा करण्यात यावी, प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच बालिकेच्या सुरक्षेची जबाबदारी असताना कर्तव्यात निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अंगणवाडी सेविका, मदतनीस व मुख्य सेविका (सुपरवायझर) यांच्यावर चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

पीडित बालिकेला ₹३० लाखांची विशेष आर्थिक मदत तात्काळ मंजूर करून तिच्या उपचार, शिक्षण, मानसिक समुपदेशन व पुनर्वसनाची जबाबदारी शासनाने स्वीकारावी, अशी मागणीही करण्यात आली.

राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांच्या सुरक्षेसाठी कठोर सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी प्रहार संघटनेने केली.

यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव चारुल रामटेके, विद्यार्थी संघटनेचे शहर अध्यक्ष आदेश मेश्राम, अन्याय अत्याचार निवारण समितीचे अध्यक्ष दिनेश वासनिक, चौधरी, मेश्राम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

“बालकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत प्रहार संघटना पाठपुरावा करेल,” अशी भूमिका उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Popular Articles