spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दीर्घ शासकीय सेवेनंतर विठ्ठल काळबांडे यांना सेवानिवृत्ती निरोप

नागपूर :- संताजी जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रद्धानंद पेठ, नागपूर येथील शिल्पनिदेशक श्री. विठ्ठल नामदेवराव काळबांडे हे प्रदीर्घ शासकीय सेवा बजावल्यानंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त नागपूर आय.टी.आय. स्टाफ क्लब असोसिएशन च्यावतीने निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपसंचालिका  कुलकर्णी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे नेते अशोक दगडे तसेच कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे नेते शामराव हाडके उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त विठ्ठल काळबांडे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात बजावलेल्या कर्तव्याचा, कार्यनिष्ठेचा आणि संस्थेच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. त्यांच्या सेवाभावी कार्याची प्रशंसा करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शासकीय सेवेत कार्यरत असताना कर्तव्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी त्यांच्या परिवारातील सदस्यांनीही वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले. कुटुंबीयांनी प्रत्येक टप्प्यावर दिलेला पाठिंबा, हातभार आणि प्रोत्साहन यामुळेच सेवाकाळातील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना बळ मिळाले. त्यांच्या यशस्वी सेवाप्रवासात परिवाराचे योगदानही महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी आवर्जून नमूद करण्यात आले. संस्थेच्या उपसंचालिका कुलकर्णी यांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ देऊन काळबांडे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना काळबांडे यांनी आपल्या सेवाकाळातील विविध अनुभवांना उजाळा देत संस्था, सहकारी अधिकारी व कर्मचारी तसेच आपल्या परिवारातील सदस्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रदीर्घ सेवाकाळात कुटुंबीयांनी केलेल्या सहकार्यामुळे आपला प्रवास अधिक सुकर झाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्टाफ क्लब असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. संस्थेतील अधिकारी, कर्मचारी तसेच सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिमाखदार नियोजनात झालेल्या या निरोप व सत्कार समारंभाची सांगता चहा-नाश्त्याने झाली.

Popular Articles