पवनी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त, ६१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0
37

हंसराज,प्रतिनिधी भंडारा पवनी :- स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने पवनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रेती वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली आहे. मौजा नायरा पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत दोन टिप्परसह एकूण ६१ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी टिप्पर क्रमांक एम.एच. ४०/ सी.टी. ००७३ चा चालक बादल अन्नाजी टेकाम (वय २२, रा. शिरसाळा, ता. पवनी) आणि टिप्पर क्रमांक एम.एच. ४०/ बी.एफ. ००७७ चा चालक आशिक प्रेमलाल माहुले (वय ३४, रा. खैरलांजी, ता. तुमसर) हे विनापरवाना अवैधरीत्या रेती वाहतूक करताना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून प्रत्येकी ३० लाख रुपये किमतीचे दोन टिप्पर आणि एकूण १८ ब्रास रेती (किंमत १ लाख ८ हजार रुपये) असा ६१ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पवनी पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ०९/२०२६ आणि भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भालेराव व त्यांच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पवनी पोलीस करीत आहेत.