– पर्यावरण व जलसंवर्धनाचा दिला संदेश
– जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माविम’चा अभिनव उपक्रम
यवतमाळ :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), यवतमाळ यांच्या वतीने जिल्ह्यात महिला स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांसाठी पर्यावरण संवर्धन व जलसंधारण विषयक विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत दारव्हा तालुक्यातील हातनी येथे लोकसंचालित साधन केंद्राच्या महिला बचत गटातील शेतकरी महिलांच्या शेतामध्ये जलतारा (शोषखड्डा) तयार करण्यात आला. या जलताऱ्याचे उद्घाटन माविमच्या व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शाह यांनी मुंबई येथून ऑनलाईन पद्धतीने केले. तसेच यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.

यावेळी राजलक्ष्मी शाह यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व अधोरेखित करताना पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक शेतकरी महिलेने आपल्या शेतात किमान एक जलतारा तयार करण्याचे आवाहन केले. जलताऱ्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होऊन भूजल पातळी वाढते, तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास सहाय्य होते, असे मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमात कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी संध्या सावंत यांनी जलताऱ्याचे तांत्रिक माहिती, महत्त्व व त्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले.
माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी महिला बचत गटातील महिलांना दरवर्षी किमान ५ झाडांची लागवड करणे, पावसाच्या पाण्याचे संधारण करणे तसेच प्रत्येक शेतकरी महिलेने आपल्या शेतात किमान एक जलतारा (शोषखड्डा) तयार करण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शेतीला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी ५० महिलांना शेवग्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच ५० महिलांना परसबागेसाठी बियाणे बँकेमधून विविध भाजीपाला बियाण्यांचे वितरण करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी रॅलीचेही आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी संध्या सावंत, जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, राम साहू, निलिमा राऊत, प्रमोद फुलसुळे, सर्व सहयोगिनी तसेच मोठ्या संख्येने महिला बचत गट सदस्य व शेतकरी महिला उपस्थित होत्या.
जिल्ह्यातील १०० गावात जलतारांची निर्मिती
तसेच माविम मार्फत जिल्ह्यात १०० गांवात जागतिक पर्यावरण निमित्ताने जलतारा निर्मिती, पर्यावरण जनजागृती, रॅली, वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या संख्यात महिला बचत गटातील महिलांनी सहभागी झाले.








